Sunday, November 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करणार – ममता बॅनर्जी

मुंबई : फॅसिस्टवादाच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचचे आहे. सध्याच्या भाजप विरोधात पर्यायी व्यवस्था उभी राहणे अत्यावश्यक आहे. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांनी आज सांगितले.

ममता बॅनर्जीं सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.  त्यानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप विरोधी पक्षांच्या आघाडीत कॉंग्रेसला कात्रजचा घाट दाखवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शरद पवार म्हणाले की, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. सध्याचे राजकारण पाहता नेता रस्त्यावर राहिला तरच विजयी होऊ शकतो असे ममता बॅनर्जींशी चर्चा सुरु असताना लक्षात आले. त्यामुळे येत्या काळात समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे.

तृणमूल कॉँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्यासाठी ममता बॅनर्जी काही दिवसांपासून देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना काल (मंगळवारी) ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आज राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेतली.

Leave a Reply