संगीत ‘मदनाची मंजिरी’ प्रदीर्घ कालखंडानंतर रसिकांच्या भेटीला
पुणे : संगीत नाटक आणि नाट्यसंगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा वसा हाती घेतलेल्या ‘कलाद्वयी’ या नाट्यसंस्थेतर्फे सुप्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले लिखित संगीत ‘मदनाची मंजिरी’ ही नाट्यकलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहे. संगीत रंगभूमीच्या दुसर्या सुवर्णकाळातील म्हणजे 1960च्या दशकातील हे नाटक असून प्रदीर्घ कालखंडानंतर नव्या संचात रंगभूमीवर पहायला मिळणार आहे. तरुणपणी या नाटकात भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर संगीत मार्गदर्शक आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहेत, हे या कलाकृतीचे आणखी एक वैशिष्ट्य! पुण्यातील ‘कलाद्वयी’ नाट्यसंस्थेच्या वतीने ही नाट्यकृती प्रथमच रंगमंचार साकारली जात आहे.
ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय गोगटे आणि तबला वादक विद्यानंद देशपांडे यांनी 15 वर्षांपूर्वी ‘कलाद्वयी’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री वर्षा जोगळेकर, गायिका-अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर आणि अभिनेते संजय गोसावी हे ‘कलाद्वयी’शी जोडले गेले. ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘संशय कल्लोळ’, ‘स्वयंवर’ या नाटकांची निर्मिती संस्थेतर्फे करण्यात आली आहे. महाकवी शेक्सपिअरच्या ‘ट्वेल्थ नाईट’ या प्रसिद्ध नाट्यावर ‘मदनाची मंजिरी’ ही नाट्यकृती आधारित असून या प्रहसनात्मक संगीत नाटकाचा प्रयोग शनिवार, दि. 4 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार असल्याची माहिती मधुवंती दांडेकर आणि संस्थेच्या विश्वस्त वर्षा जोगळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गायक अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर, संस्थेचे विश्वस्त संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, संजय गोसावी उपस्थित होते.
संगीत नाटकाविषयीची रुची कमी होऊ लागली होती त्या काळात विद्याधर गोखले यांनी पौराणिक, सामाजिक, मध्ययुगीन कालखंडावर आधारित लिहिलेल्या नाटकांमुळे प्रेक्षक पुन्हा एकदा संगीत रंगभूमीकडे वळू लागला. त्यातीलच ‘मदनाची मंजिरी’ हे भक्ती, हास्य आणि श्रृंगाररसाने नटलेले नाटक. त्याकाळी चार-साडेचार तास चालणारे नाटक आजच्या काळातील प्रेक्षकांचा विचार करून अडीच तासाची कालमर्यादा निश्चित करून रंगभूमीवर आणण्यात येत आहे.
‘ऋतुराज आज वनी आला’, ‘मजला कुठे न थारा’, ‘मानिनी सोड तुझा अभिमान’, ‘अंग अंग तव अनंग’, ‘तारिल तुज अंबिका’, ‘आली प्रणय चंद्रिका करी’ ही नाट्यपदे आणि गझल गायकीच्या अंगाने सादर होणारे ‘ये मौसम है रंगीन’ हे पद आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असून नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने प्रत्यक्ष रंगमंचावर कलाकारांकडून ऐकायला मिळणार आहेत. शास्त्रीय संगीतावर आधारित पण त्या-त्या व्यक्तिरेखेचा विचार करून सुप्रसिद्ध संगीतकार, ऑर्गनवादक प्रभाकर भालेकर यांनी नाविन्यपूर्ण व भावपूर्ण चाली नाटकातील पदांना दिल्या आहेत. तसेच सुप्रसिद्ध गायक-अभिनेते पंडित राम मराठे यांनी चाली दिल्या आहेत.
रंगशारदा या नाट्यसंस्थेद्वारे 20 मार्च 1965 रोजी ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला. डॉ. सुमन माटे, पंडित रामदास कामत, कान्होपात्रा किणीकर, चंदू डेगवेकर, मोहन दांडेकर, मधुवंती दांडेकर, शुभदा दादरकर, प्रकाश घांग्रेकर, विनायक दामले, अशोक सराफ आदी सुप्रसिद्ध कलाकारांनी या नाटकात भूमिका साकारलेल्या आहेत. ‘कलाद्वयी’तर्फे होणार्या प्रयोगात पुण्यातील आघाडीचे कलाकार चिन्मय जोगळेकर, अस्मिता चिंचाळकर, सावनी दातार-कुलकर्णी, संजय गोसावी, मंगेश चिंचाळकर, ओंकार खाडिलकर, सयाजी शेंडकर, निरंजन कुलकर्णी, अर्चना साने यांच्या भूमिका आहेत. नाट्यसंगीताचा बाज पुरेपूर माहिती असलेले संजय गोगटे (ऑर्गन) आणि विद्यानंद देशपांडे (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) साथसंगत करणार आहेत.
