मुंबई, पुण्यातील शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंद राहणार
नाशिक येथील शाळा 10 डिसेंबर पर्यंत बंद राहणार
औरंगाबाद शहरातील शाळा बंद राहणार, तर ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार
पुणे / मुंबई : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्यात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे महापालिकेने उद्या पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय तूर्तास तरी लांबणीवर टाकला असून शाळा15 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई व पुण्यात उद्यापासून (1 डिसेंबर) शाळा सुरू होणार नाहीत.
राज्यात उद्या पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयानंतर ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. शाळा सुरू करण्या संदर्भात आज पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात चर्चा झाली. यावेळी पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुढील परिस्थिती पाहून शाळा कधी सुरू करायच्या हा निर्णय घेतला जाणार आहे.
तर मुंबई महापालिकेने 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच नाशिक महापालिकेनेदेखील 10 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद शहरातील शाळा सुरू होणार नाहीत. ग्रामीण भागातील शाळा सुरू उद्यापासून सुरू होणार आहेत. औरंगाबादच्या ग्रामीण भागातील शाळा उद्यापासून सुरू करणार असल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. औरंगाबाद शहरातील शाळांबाबतचा निर्णय 10 डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून घेण्यात येईल असे मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी सांगितले.
पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद शहर भाग वगळता राज्यातील इतर भागात राज्य शासनाच्या निर्णया नुसार एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर शाळेची घंटा वाजणार आहे.
