महाविकास आघाडी सरकार 2024 मध्ये पण सत्तेत येणार – नवाब मलिक
पुणे : गेल्या बरेच दिवसापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील हे थोडायाच दिवसात हे सरकार पडणार, असे म्हणत आहेत. त्यावर महाविकास आघाडी सरकारने 2 वर्षे पूर्ण केली आहेत. सरकार काही पडले नाही. आम्ही 2024 मध्ये पण सत्तेत येणार, असा विश्वास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोपळकर, सचिव सुजित तांबडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत चांगली असून ते दोन-तीन दिवसात घरी येतील. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्या शरद पवार यांची भेट घेणार आहेत. असे सांगून नवाब मलिक म्हणाले, परवा महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे झाली आहेत. या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्याचे अनेक प्रश्न सरकारने सोडविले आहेत. कोविड ची परिस्थिती ही सरकारला चांगल्या पद्धतीने हाताळता आली. परदेशात जी कोविड ची परिस्थिती त्यापेक्षा खूप चांगली परिस्थिती महाराष्ट्रात आहे. मोदी सरकारने महागाई व बेरोजगारी वाढवली आहे. ती राज्य सरकार कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑन द जॉब ट्रेनिंग मधून प्रत्येक बेरोजगार तरुणाला सरकार नोकरी देणार आहोत. सहा लाख बेरोजगार तरुणाना सरकार या माध्यमातून नोकरी देणार आहे.
