मानहानी प्रकरणात नवाब मलिकांना तात्पूर्ता दिलासा
मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणा मागे भाजप नेते मोहित कंबोज यांचा हात असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. या विरोधात कंबोज यांनी मलीक त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी मलिक यांना तूर्तास दिलासा मिळाला असून आज कोर्टाने त्यांना 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर केला आहे. माझगाव कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी 30 डिसेंबर रोजी होणार आहे.
मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अनेक नवे खुलासे होत आहेत. दरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा स्वतः तिकीट काढून क्रूझवर गेला नव्हता, तर आर्यन क्रूझवर यावा म्हणून भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मेहुण्यानं षडयंत्र रचले होते, असा आरोप मलिक यांनी केला होता. मलिकांच्या या आरोपांनंतर मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला होता. दरम्यान आता या प्रकरणी मलिकांना जामीन मंजूर झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
