येऊ घातलेल्या कंत्राटदारी विरोधात कचरा वेचकांची निषेध सभा
पुणे : कामाची शाश्वती, प्रोत्साहन भत्ता आणि सन्मानाची अपेक्षा असतानाच; पुण्यातील कचरा वेचकांना कंत्राटदारीची टांगती तलवार आहे. तसेच त्यांच्या पदरी फसवणूक आणि निराशा येत आहे. पुण्याला देशात स्वच्छ शहराचा सन्मान मिळण्यासाठी झटणारे ३६०० कचरा वेचक तात्पुरत्या मुदतवाढीने आणि शहरात कंत्राटदारी आणण्याच्या प्रस्तावाने निराश झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील कचरा वेचकांची निषेध सभा पार पडली.
‘स्वच्छ’या भारतातील पहिल्या कचरा वेचकांची संपूर्ण मालकी असलेल्या सहकारी संस्थेचे मागील १३ वर्षांचे कष्ट, पुण्याच्या कचरा व्यवस्थापनात केलेले भरीव योगदान आणि कचरा वेचकांची शाश्वत उपजीविका याकडे दुर्लक्ष करीत एक वर्षाची तात्पुरती मुदतवाढ ‘स्वच्छ’ ला दिली. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी कचरा वेचकांची फसवणूक केल्याचा आरोप कचरा वेचकांनी केला आहे. या निर्णयाविरोधात आज पुणे महानगरपालिकेच्या बाहेर पुण्यातील सर्व भागातील कचरा वेचकांनी आज निषेध सभा घेतली. या निषेध सभेचे नेतृत्व स्वच्छ पुणे चे अध्यक्षा सुमन मोरे यांनी केले. आमचे 5 वर्षासाठी नूतनीकरण करावे, आम्हाला covid- भत्ता, जीवन विमा, मागील काळातील ठरलेल्या रोजच्या कामाचे साहित्य देण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
