पुणे विद्यापीठाचा शिक्षणा ऐवजी सुशोभीकरणावर भर
पुणे : पुणे विद्यापीठाचे प्रशासन ज्या गोष्टींसाठी खर्च करायला हवा तिथे न करता इतर कामांसाठी खर्च करीत आहे. विद्यार्थिसंख्या कमी असणारे कोर्सेस बंद करणे, विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात कपात करण्याऐवजी वाढ करणे, विद्यापीठात मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक असताना सर्वत्र लोखंडी जाळ्या बसविणे, अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक आणि साइडपट्ट्यांसाठी लाखो रुपये खर्च करणे, कुलगुरू, कुलसचिव आणि अन्य अधिकार्यांना अतिरिक्त भत्ते देणे, त्यांच्या घरांवर लाखोंचा खर्च करणे आदी कामे विद्यापीठ प्रशासन करीत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळणदेखील केली जात आहे. परंतु, विद्यार्थिहितासाठी कोणताही निर्णय घेण्याची वेळ आली, की विद्यापीठ आर्थिक तोट्यात असल्याचे सांगण्यात येते, असा आरोप विद्यार्थी संघटनांच्या वतीने केला आहे.
यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, विद्यापीठ प्रशासनाने नवीन वसतिगृहे बांधून निवासी क्षमतेचा विकास केला आहे. लिबरल आर्ट्स, डिझाइन, हॉस्पिटॅलिटी, ब्लेंडेड बीएस्सी, जेम्स ज्वेलरी, हॉस्पिटल मॅनेजमेंट यांसारखे अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम माफक शुल्कात सुरू केले आहेत. ग्रंथालये, जर्नल्स, प्रयोगशाळा इत्यादी संशोधनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात विकसित केल्या आहेत, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कारभार सध्या ‘दिखाऊ माल फसवा कारभार’ या म्हणीनुसार चालू आहे. विद्यापीठ आवारातील अनेक गोष्टींकरिता नाहक खर्च केला जात आहे. परंतु मूळ शिक्षणावरील खर्चात मात्र विद्यापीठ तोट्यात असल्याचे सांगून टाळाटाळ केली जात आहे. ”
– कल्पेश यादव, राज्य सहसचिव, युवासेना
विद्यार्थ्यांच्या फेलोशिप बंद केल्या, फीमाफीच्या आदेशावर स्थगिती आणली अशा अनेक निर्णयांना स्थगिती देऊन विद्यापीठ विद्यार्थ्यांचेच पैस घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आहे. दुसरीकडे पैसे नाहीत, असे म्हणून विद्यापीठ परिसरात अनेक विकासकामे चालू आहेत. विद्यापीठाने विद्यार्थीहिताचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज आहे.”
– शुभंकर बाचल, पुणे महानगरमंत्री, अभाविप
विद्यार्थ्यांच्या हितासाठी लागणारी रक्कम खर्च करण्यास विद्यापीठ प्रशासन नकार देत असेल तर ते मुळीच मान्य नाही. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असे सांगण्यात येणार्या पुणे विद्यापीठाचे कोणत्याचबाबतीत स्पष्ट धोरण नाही. त्यामुळे यापुढे युवक काँग्रेस म्हणून आम्ही शासनस्तरावर विद्यापीठातील प्रशासकीय एकाधिकारशाहीबाबत तक्रार करणार आहोत.”
– अक्षय जैन, सचिव-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, समन्वयक शिक्षण विभाग
