fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

बालसाहित्य लोकार्पण सोहळा आणि संविधान बांधिलकी परिसंवाद संपन्न

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नुकतीच बालकुमार वयोगटासाठी पुस्तकांची निर्मिती केली आहे. ‘भुताने लावली लाईट’ (लेखक -कुमार मंडपे), बिल्लोरीचे कवडसे’ व ‘आणि माठ हसला…’ (दोन्हीच्या लेखिका नीलम माणगावे) आणि ‘बज्याचे चित्तथरारक शोध’ (लेखक-प.रा.आर्डे) ही ती पुस्तके आहेत.
या पुस्तकांचा पुणे येथील लोकार्पण सोहळा २७ नोव्हेंबर २०२१ रोजी बाणेर येथे पार पडला. याच कार्यक्रमात २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या संविधान दिन बद्दल परिसंवादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात अंनिसच्या धडाडीच्या दिवंगत कार्यकर्त्या शालिनीताई ओक यांच्या स्मृतीस अभिवादन व त्यांनी गायलेल्या गीताच्या ध्वनीचित्रफितीने झाली. त्या बरोबरच डॉ दाभोलकर यांच्या मुलांमधील वैज्ञानिक दृष्टीकोण संबंधित प्रश्नोत्तरची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका प्राची दुधाने या होत्या. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भोर येथील डॉ. अरुण बुरांडे हे होते.

प्राची दुधाने म्हणाल्या, “एका बाजूला बऱ्याचशा शिकलेल्या महिला अंधश्रद्धा आणि जुनाट समजुतीना कवटाळून बसतात. दुसऱ्या बाजूला स्त्रीचा संघर्ष हा जन्मापासूनच असतो. आधी मी सगळं व्रतवैकल्ये करत होते, आता मी बदलले आहे. आपल्याला समानतेचा व बंधुता, भगिनीभाव ही मूल्ये निर्माण करणे गरजेचे आहे. येणाऱ्या पिढ्यांमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. स्त्री म्हणून मिळणाऱ्या नकाराला तोंड दिलं पाहिजे. मुलांची वैचारिक भूक भागवण्यासाठी आपण पालकांनी सतत शिकत राहिलं पाहिजे. त्यांचे प्रश्न न टाळता त्या प्रश्नावर वैज्ञानिक दृष्टिकोनाने त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे.”

लेखक कुमार मंडपे यांनी शाळा, प्रशासकीय कार्यालये यामध्ये देव देवतांची चित्रे न लावून धर्मनिरपेक्षता मूल्याचे पालन करण्यासाठी आपण आग्रही कसं राहिलं पाहिजे अशी भूमिका मांडताना स्वतः त्यांनी यासाठी बऱ्याच ठिकाणी काम कसे केले त्याबद्दलचे अनुभव सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी लहान मुलांच्या गोष्टी अधिकाधिक लिहिल्या आणि सांगितल्या गेल्या पाहिजेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रमोदिनी मंडपे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत संविधान, स्त्रिया व समानता या विषयावर विवेचन केलं. महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत पोतदार यांनी बदलत्या परिस्थितीत संघटना विस्तार, चळवळीची वाटचाल आणि नवीन उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती दिली.

दुसऱ्या सत्रात संविधान परिसंवाद पार पडला. डॉ. अरुण बुरांडे हे अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला अंनिस ट्रस्टचे सदस्य गणेश चिंचोले यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले आणि त्यांच्याबरोबर उपस्थित सर्वांनी संविधान रक्षणाची शपथ घेतली. अरविंद पाखले यांनी आपल्या मांडणीत घटना समिती स्थापन कशी झाली याचा आढावा घेतला तसेच भारताच्या संविधानाची जगात कुठेही नसलेली वैशिष्ट्ये सांगितली. श्रीपाल ललवाणी यांनी संविधान बांधिलीकी, वैज्ञानिक दृष्टीकोण, धर्मनिरपेक्षता, समानता व सद्य परिस्थिती समोरची आव्हाने यावर मांडणी केली. त्यांनी महाराष्ट्र अं.नि.स.चे काम हे संविधानाच्या चौकटीत कसे चालते याविषयी अधिक माहिती सुद्धा दिली.

प्रबोधनात्मक रिंगण नाटकाचे १०० प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या चाकण शाखेचा विशेष गौरव करण्यात आला. चाकण शाखेचे नारायण करपे यांनी ‘रिंगण’ नाटकाचे अनुभव मांडले. यावेळेस अंनिस बाणेर शाखा सुरु करण्याचा संकल्प करण्यात आला व आजच्या कार्यकमातून जमा झालेला निधी विश्वास पेंडसे यांच्या हस्ते जेष्ठ कार्यकर्त्यां अलका जाधव यांच्या कडे सपूर्त करण्यात आला.

राजेंद्र कांकरिया, प्रतिभा पाखले, अरविंद पाखले यांनी सर्वांचे स्वागत केले आणि परिचय करून दिला. डॉ. रवी वरखेडकर, विजय सुर्वे, शाहू आपटे, विश्वास पेंडसे, राजू जाधव यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. राहुल माने यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading