fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsPUNE

नियोजन आणि समर्पण हे यशस्वी कार्यक्रम आयोजनाचे सूत्र – विद्याधर अनास्कर

पुणेः- कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यामागे आयोजकाचे अनेक पातळ्यांवर नियोजन असते. याच नियोजनाला समर्पणाची जोड असल्यास तो कार्यक्रम यशस्वी होतो, असे मत असे मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणारा आदर्श संयोजक पुरस्कार महाराष्ट्र कला प्रसारिणी सभा ह्या संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांना विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक, साहित्यीक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठानतर्फे या पुरस्काराने गौरविण्यात येते. मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यभुषण फौंडेशनचे अध्यक्ष डाॅ.सतीश देसाई तसेच रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना विद्याधर अनास्कर म्हणाले की, कार्यक्रमाचे आयोजन करतांना आयोजकांची कसोटी लागते. सर्वसाधारणपणे साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून विचार प्रवर्तनाचे कार्य होत असते. कोणत्याहीकोणत्याही कार्यक्रमातून वक्ता आणि श्रोता यांच्यात सहचिंतन साधता आले पाहिजे.

यावेळी बोलताना डाॅ.सतीश देसाई म्हणाले की, कार्यक्रम आयोजनामागे आयोजकाचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. त्यामुळे कार्यक्रमात सुसूत्रता येते. कृतज्ञतेची भावना लोप पावलेली असतांना चांगल्या आयोजकांची गरज जाणवते. वसंत व्याख्यानमाला, सवाई गंधर्व, पुणे फेस्टिव्हल, गणपती उत्सव हे पुण्याचे निवडक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कार्यक्रमांना देखील चांगला प्रतिसाद मिळत असून आयोजकांनी याही पर्यायाचा विचार करावा. कार्यक्रम अधिकाधिक उंचीवर कसा नेता येईल, याची संपूर्ण कल्पकता आयोजकांमध्ये असली पाहिजे. कार्यक्रम आयोजना मार्फत माणसातला माणूसही घडविण्याची प्रक्रीया होत असते.

यावेळी बोलताना सचिन ईटकर म्हणाले की, आयोजकाने दुय्यम भूमिका ठेवून कार्यक्रम आयोजित केल्यास ते यशस्वी होतात. आयोजना मागची भूमिका प्रामाणिक असली पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्रातही राजकारण असते. एखादा कार्यक्रम कसा पडेल,यामागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे अनेकजण प्रयत्नशील असतात. मात्र, माझ्या सुदैवाने मला पुण्यातील अग्रक्रमांकीत आयोजकांकडून नेहमी स्नेह, प्रेम, मार्गदर्शन आणि मदतच मिळाली आहे. आजचा पुरस्कार आगामी कार्यक्रम आयोजित करण्यामागची प्रेरणा असून या पुरस्काराची ऊर्जा घेऊन भविष्यातही चांगले कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘घर’ या विषयावर निमंत्रित मान्यवर कवींचे कवी संमेलन झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading