Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

विविध विषयांवर ऊहापोह करत इंडो फ्रेंच नॉलेज समिटची सांगता

 

पुणे :  कोव्हिड या वैश्विक महामारीनंतर जगभराला भासलेली आरोग्य क्षेत्रातील संशोधनाची गरज त्याच्या सोबतीने कृत्रिम बुध्दीमत्ता, शाश्वत ऊर्जा, नैसर्गिक साधनसंपत्ती आदी सर्वच विषयात सखोल चर्चा आणि उहापोह करत तिसऱ्या इंडो- फ्रेंच नॉलेज समिटची सांगता शुक्रवारी करण्यात आली.

या तीन दिवसीय परिषदेत फ्रान्ससोबतच भारतातील अनेक राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक व संशोधनातील संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये आरोग्य या विषयात बंगलोर येथील टाटा इन्स्टिट्यूट फॉर जनेटिक्स अँड सोसायटीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा, हैदराबाद येथील सेन्टर फॉर सेल्युलर अँड मोल्युक्युलर बायोलॉजीचे संचालक डॉ. विनय नंदीकुरी हे सहभागी झाले होते. तर सागरी विज्ञान विषयात बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राध्यापक कार्तिक शंकर सहभागी झाले होते. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे प्रा. निखिल पाल, प्रा. उत्पल गराईन, गणित तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञ प्रा.के.व्ही.सुब्रमण्यम सहभागी झाले होते. तर शाश्वत ऊर्जा या विषयावर आधारित चर्चासत्रात मद्रास आयआयटीमधील प्रा. अशोक झुणझुणवाला व प्रा. प्रीती आघालायम सहभागी झाले होते. तर हरित रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधने या विषयावर नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या डॉ. शुभांगी उंबरकर यांनी आपले विचार मांडले.

या ऑनलाईन पार पडलेल्या समिटला जगभरातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. निवडलेल्या पाच विषयामध्ये जागतिक पातळीवर काय संशोधन सुरू आहे, कोणत्या विषयांवर काम करणे आवश्यक आहे, कोणते प्रश्न वैश्विक पातळीवर सोडविण्याची गरज आहे. तसेच भविष्यात कोणत्या दिशेने संशोधन, अभ्यास व्हायला हवे आदी सर्व विषयांवर यावेळी चर्चा झाली.

येत्या काळात भारत आणि फ्रान्स देशातील अनेक शैक्षणिक तसेच संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था एकत्र येतील व याबाबत काही संशोधन प्रकल्प हाती घेतली अशीही चर्चा या समिटमध्ये करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading