‘बाईपण भारी देवा’ केदार शिंदेचा नवा चित्रपट

एका मोठ्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शनासाठी तयार असलेली एक सुंदर कलाकृती अखेर २८ जानेवारी २०२२ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. माधुरी भोसले यांच्या ‘स्क्रीनशॉट्स स्टुडिओज’ निर्मित ‘बाईपण भारी देवा’ हा केदार शिंदे दिग्दर्शित  चित्रपट, एक सुंदर विषय घेऊन येत आहे.

स्त्रीत्त्वाचे विविध पैलू प्रभावीपणे हाताळत त्यावर पॉवरफुल चित्रपट निर्मितीत केदार शिंदेचा हातखंडा आहे. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्गबाई अरेच्चा’ या सुपरहिट चित्रपटानं विनोदी ढंगात स्त्रीच्या मनाचा एक प्रभावी पैलू, ज्या विनोदी ढंगात उलगडला त्या ‘फँटसी शैली’ला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. मग केदार शिंदेच्या ‘जत्रा’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ पासून अगदी अलिकडच्या काळातील ‘अग्गबाई अरेच्चा 2’ सारख्या अनेक  चित्रपटांना प्रेक्षकांनी  मनापासून दाद दिली.

स्त्रियांमधील अनेक ज्ञात – अज्ञात अशा प्रभावी पैलूंना अधोरेखित करणारा केदारचाच हा पुढचा चित्रपट, त्याच्या इतर कलाकृतींइतकाच प्रभावी असणार ! ‘नो टेन्शन फुल टशन’ सांगत चित्रपटाचं एक खास पोस्टर देखील आज प्रदर्शित झालं. शिवाय महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या तारखा अजून तरी जाहीर झाल्या नसल्या तरी त्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची तारीख जाहीर करून ‘ताई – माई – आक्का’ला या पोस्टर मधून एक गमतीदार साद घातली आहे ! या पोस्टरमुळे या चित्रपटाविषयी जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे…. ‘पोस्टर’मधली नायिका कोण आहे? पोस्टरमधील ती नायिका तिच्या पाठीवर, ती निभावत असलेल्या वेगवेगळ्या नात्यांतील भूमिका मिरवत ठामपणे  का उभी आहे? …. केदारच्या चित्रपटांमधली पात्रं कायमच औत्सुक्याचा विषय ठरतात. या चित्रपटात कोणती पात्रं आहेत? चित्रपटातील कलाकार कोणते?…. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला २८ जानेवारीला मिळतील!

केदार शिंदे म्हणाले, “कोरोनाकाळातील टेन्शननंतर हा चित्रपट म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी असणारं एक परिपूर्ण मनोरंजन आहे, शिवाय कोणतही मनोरंजन हे फक्त विनोदापुरतं मर्यादित न राहता त्यात प्रेक्षकांना आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब देखिल दिसायला हवं असं मला वाटतं. स्त्रीच्या मनाचा वेध घेणारा हा चित्रपट मी माझ्या आईला, बहिणीला, बायकोला, मुलीला आणि ज्यांच्यांमुळे मी आहे अशा सर्व स्त्रियांना समर्पित करत आहे! मला खात्री आहे प्रत्येक स्त्रीला आणि तिच्या कुटुंबाला हा सिनेमा त्यांचा स्वतःचा आहे असं वाटेल!”

Leave a Reply

%d bloggers like this: