Monday, May 4, 2026
Latest NewsMAHARASHTRA

प्रत्येक संकटावर मात करुन महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने पुढे जात राहणार – उपमुख्यमंत्री 

दिवे आगार येथे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना 

दिवे आगार : महाराष्ट्राने अनेक संकटे पाहिली, अनेक संकटे झेलली. परंतु हा महाराष्ट्र कधी थांबला नाही. यापुढेही हा महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी आज येथे केले.

आज अंगारकी चतुर्थी आणि याच दिवशी दिवेआगारचे वैभव असलेल्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा हा  दिवस दिवेआगारवासियांसाठी सुवर्ण क्षणआहे. येथील चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याच्या प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री  अजित  पवार यांना सपत्नीक सुवर्ण गणेशाची पूजा करण्याचा मान मिळाला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, सरपंच उदय बापट, सुवर्ण गणेश मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर, उपाध्यक्ष निलेश वाणी, श्रीमती सुनेत्रा पवार, श्रीमती वरदा तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी उपस्थित होते.

दिवेआगार ग्रामपंचायत व ग्रामसचिवालय कार्यालयासाठी एक कोटी रुपये निधीची घोषणा करून उपमुख्यमंत्री म्हणाले की, फलोत्पादन योजनेचे यश हे खरंतर कोकणवासियांमुळेच पाहायला मिळाले आहे. राष्ट्रीय गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. एसटी कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. रायगडच्या भौगोलिक दृष्टीने येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी स्थापित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असून शासन या कामात सर्व प्रकारचे सहकार्य करीत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये करावयाच्या मदतीबाबत एनडीआरएफच्या निकषांमध्ये काही बदल काही सुधारणा आवश्यक आहेत, त्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. रायगडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होत आहे. त्याचबरोबर फळप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

कृषी पर्यटन धोरण, समुद्रकिनाऱ्यावरील बीच शॅक, निसर्ग पर्यटन धोरण, शामराव पेजे महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद, अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा विकास, जेट्टी विकास कार्यक्रम, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, मॉडेल आश्रमशाळा, वसई-विरार- अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर आदी विकास कामांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासक भाष्य केले. तसेच दिवेआगार समुद्रकिनारा विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असेही आदेश दिले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading