Monday, May 4, 2026
Latest NewsPUNE

अंगारकीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराला गजलक्ष्मी महालाची पुष्पआरास

पुणे : मंगलमूर्ती मोरया…ओम् गं गणपतये नम :… गणपती बाप्पा मोरया…अशा गणेशनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. वर्षातील शेवटचा अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली गजलक्ष्मी महालाची आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायनसेवा दिली. त्यापूर्वी ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. स्वराभिषेकानंतर श्री गणपती विशेष महाअभिषेक पार पडला. याशिवाय श्री गणेशयाग सहस्त्रावर्तने व मंगलआरती आदी कार्यक्रम मंदिरात पार पडले.

मंदिरावर केलेल्या गजलक्ष्मी महाल पुष्पसजावटीमध्ये ५० हत्ती साकारण्यात आले. त्याकरीता ८ हजार किलो झेंडू, पर्पल-पांढरा-पिवळया शेवंती, अस्टर, गोल्डन बॉल्स यांसह विविध फुलांचा समावेश होता. पुष्पसजावट २०० महिला व पुरुषांनी सलग तीन दिवस काम करुन साकारली. मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच मोठया संख्येने गर्दी केली. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या पुढेपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरावर आकर्षक तोरण आणि रांगोळ्यांची सजावट देखील करण्यात आली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading