पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव मंगळवारपासून
पुणे : कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सव व चंडीभैरव महायाग होणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. २३) दीप प्रज्वलन, स्थापित देवतांचे आवाहन व पूजन होणार आहे. दिनांक २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ७ दरम्यान स्थापित देवतांचे पूजन, भैरव मंत्रजप, दुर्गापाठ, सायं पूजन व आरती असे दैनंदिन धार्मिक विधी पार पडतील.
तर शुक्रवारी (दि.२६) चंडीभैरव महायाग, उत्तरपूजन व पूर्णाहुती होणार आहे. याशिवाय शनिवारी (दि.२७) सकाळी ७.३० वाजता लघुरुद्र, महापूजा, आरती होणार असून दुपारी १२ वाजता अष्टोत्तरी शत नामावली, रात्री ८ वाजता आरती व रात्री १२ वाजता मुख्य जन्मसोहळा होईल. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत आहे. भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. भाविकांनी श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले.
