जग कितीही आधुनिक झाले तरी फाउंटन पेनचे अस्तित्व कायम – फाउंटन पेन अभ्यासक प्रा.यशवंत पिटकर

पुणे : आजच्या काळात लॅपटॉप, मोबाईल यामुळे डिजिटलायझेशन जरी झाले असले, तरी फाउंटन पेन अजूनही अस्तित्वात आहेत. डिजिटल क्रांतीनंतर पुस्तके संपुष्टात येतील असे म्हटले गेले, परंतु डिजिटल क्रांती नंतर देखील पुस्तकांचा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जग कितीही आधुनिक झाले तरी फाउंटन पेनचे अस्तित्व कायम राहिल, असे मत फाउंटन पेन अभ्यासक प्रा.यशवंत पिटकर यांनी व्यक्त केले.

पुणे पेन लव्हर्स या फाउंटन पेन प्रेमी समूहातर्फे आपटे रस्त्यावरील ग्रीन सिग्नल रेस्टॉरंट येथे फाउंटन पेन अभ्यासक प्रा.यशवंत पिटकर यांच्याशी फाउंटन पेन डे च्या निमित्ताने संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्हिनस टेÑडर्सचे सुरेंद्र करमचंदानी यांसह पेन प्रेमी उपस्थित होते. प्रा.पिटकर यांचा पुणेरी पगडी, शाल देऊन सन्मान करण्यात आला. व्हिनस टेÑडर्सच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रा.यशवंत पिटकर म्हणाले, ज्यांनी फाउंटन पेनचा अनुभव घेतला ते फाउंटन पेनचा वापर करणे कधीच सोडत नाहीत. बॉलपेन आणि फाउंटन पेन यांची तुलना करताना लक्षात येते की, फाउंटन पेन हे पर्यावरण पूरक आहेत. बॉल पेन हे वापरून झाल्यावर फेकून दिले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक निर्माण होते. फाउंटन पेन हे आयुष्यभर वापरता येतात कारण त्यांचा पुनर्वापर करता येतो.

सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पहिल्या शुक्रवारी हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आम्ही हा उपक्रम नोव्हेंबर महिन्यात राबवितो. जास्तीत जास्त लोकांनी फाउंटन पेनचा वापर करावा. फाउंटन पेनविषयी जनजागृती व्हावी, याकरीता असे कार्यक्रम आम्ही घेतो. प्रा. पिटकर हे गेल्या ४० वर्षांपासून फाउंटन पेन, शाई याविषयी अभ्यास करीत असून त्याचे संग्राहक देखील आहेत. त्यामुळे पुणेकरांना त्यांच्याशी संवाद साधता यावा, याकरीता कार्यक्रम घेण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: