भावभावनांच्या हिंदोळ्यातून शब्दरूपात सजलेली ‘संडे डिश’ वाचकांच्या हाती

पुणे : समाज मनातील भावभावनांच्या गुंत्यातून एक-एक धागा उलगडत जाणार्‍या तरल स्पंदनांची मालिका वाचकांपर्यंत पोहोचली आहे ती ‘संडे डिश’ या पुस्तकाच्या माध्यमातून. लेखक हा सामाजिक कार्यकर्ता, समुपदेशकाच्या भूमिकेत असल्याने त्याच्या निरिक्षण कौशल्यातून हेरल्या गेलेल्या मानवी स्वभावातील आंदोलनांच्या गोष्टी त्याने शब्दबद्ध केल्या असून त्यावर रसिक मोहित झाले आहेत.

2016 या वर्षातील मे महिन्यापासून मंगेश मधुकर यांची समाजमाध्यमाद्वारे अनोखी शब्दचळवळ सुरू झाली. दर रविवारी पहिल्या प्रहरी अलक, लघुकथा, कथा या स्वरूपात ही शब्दभेट वाचकांच्या हाती येऊ लागली. समाजमाध्यमाद्वारे ज्या वेगाने ‘संडे डिश’चा प्रचार प्रसार विविध वयोगटातील वाचकांमध्ये झाला त्याच वेगाने लेखकाच्या लेखन शैलीवर पसंतीची मोहोरही उमटत गेली. खुमासदार, खुसखुशीत शैलीतील या रसपूर्ण आणि वैविध्यपूर्ण ‘संडे डिश’चे पुस्तक रूपातील प्रकाशनही अनोख्या पद्धतीने म्हणजे वाचक प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. शंतनू खानापूरकर, कल्पना साळुंखे, हेमंत चोपडा, मेधा मंगेश तसेच ज्येष्ठ साहित्यिक ल. म. कडू यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. गमभन प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. समाजमाध्यमाद्वारे आजपर्यंत 275 पेक्षा जास्त कथा वाचकांपर्यंत पोहोचल्या असून त्यातील निवडक कथांचा या पुस्तकात समावेश आहे.

विशेष निमंत्रित असलेल्या मंगेश मधुकर यांच्या शालेय शिक्षिका अरुणा जरंडीकर आणि कल्पना साळुंखे यांनी मंगेश यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन मंगेश हा भविष्यात वेगळ्या वाटेने मार्गक्रमण करेल हे जाणवले होते, असे सांगितले. गांधारीला जशी हजार अपत्ये होती त्याच प्रमाणे हजारो विद्यार्थी हे शिक्षकांना अपत्या प्रमाणेच असतात. परंतु विद्यार्थ्यांना घडविताना शिक्षकांच्या डोळ्यावर गांधारीसारखी पट्टी नसते तर डोळसपणे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. आपण घडविलेले विद्यार्थी यश संपादन करताना पाहून शिक्षकांचा आनंद गगनात मावत नाही, त्यांचा अभिमान वाटतो असे सांगताना या शिक्षकद्वयींचा कंठ दाटून आला. तर ‘संडे डिश’च्या वाचकांनी उस्फूर्त प्रतिक्रिया नोंदविल्या.
कथांचे अभिवाचन समाजमाध्यमाद्वारे वाचकांच्या हाती दिलेल्या ‘200 रुपये’, ‘ती माहेरी जाते’ आणि ‘प्रेम स्टोरी’ या कथांचे अभिवाचन गौरी कुलकर्णी, मिलिंद सवाई, सुप्रिया शेलार आणि श्रीराम ओक यांनी केले.
मान्यवरांचे स्वागत मेधा मंगेश, जान्हवी श्रीराम, श्रद्धा जयदीप, बिपीन सांगळे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीराम ओक यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: