Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

तब्बल ११ हजार पणत्यांनी उजळले श्री महालक्ष्मी मंदिर 

पुणे : विविधरंगी फुलांची सजावट, रांगोळी व गालिचा आणि आकर्षक रंगातील पणत्यांसह दिव्यांची आरास अशा मंगलमय व प्रसन्न वातावरणात सारसबागेजवळील श्री महालक्ष्मी मंदिर उजळून निघाले.  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांच्या प्रकाशाने तेजोमय झालेले मंदिर पाहण्यासोबत देवीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली.
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ११ हजार पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख
विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, नारायण काबरा आदी यावेळी उपस्थित होते.
देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिला विविधरंगी वेशभूषेत दीपोत्सवात सहभागी झाल्या होत्या़. फुले, पणत्यांचे दिवे अशा सर्व पर्यावरणपूरक गोष्टी वापरून दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील प्रत्येक खांबाला फुलांच्या माळा व मंदिर परिसरात विद्युतरोषणाई देखील करण्यात आली होती.
प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, पर्यावरण संवर्धनाबद्दल समाजातून नेहमीच चिंता व्यक्त केली जाते़. मात्र, त्यासाठी पुढाकार घेण्यात आपण नेहमीच मागे राहतो़ प्रत्येकाने स्वत:पासून जर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी उचलण्यास सुरूवात केली तर, परिवर्तन नक्कीच दिसून येईल़. त्यामुळेच मंदिरामध्ये पर्यावरणापूरक गोष्टी वापरून दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading