Friday, May 15, 2026
Latest NewsMAHARASHTRA

संविधान दिन साजरा करण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे

भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. केंद्रा प्रमाणे राज्य सरकारनेही संविधान दिन साजरा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी विनंती आज भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. या बाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला तसेच उपमुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

माने यांनी म्हंटले आहे की, भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाने १३ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्राद्वारे निर्देश जारी केले आहेत, यानुसार संविधान दिनाच्या दिवशी भारताचे महामहिम राष्ट्रपती संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये संविधानाची प्रस्ताविका वाचून संविधान दिन समारंभाचा शुभारंभ करतील. यावेळी, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, मंत्री, संसद सदस्य, आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. याबरोबरच प्रास्ताविका वाचनाचा कार्यक्रम सर्व कार्यालयात सर्व ठिकाणी आयोजित करण्यात यावा. इंग्रजी सह सर्व भाषांमध्ये प्रास्ताविका वाचन करावे. ‘संविधानिक लोकशाही’ या विषयावर ऑनलाइन प्रश्नमंजुषा कार्यक्रम घ्यावा. तसेच, संविधान जागृतीसाठी वेबिनार, इतर कार्यक्रम आयोजित करावे. असे ही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस दरवर्षी देशभर साजरा करण्याचे घोषित केले होते. त्या अनुषंगाने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त दोन दिवस संसदेचे विशेष सत्र बोलावून संविधानावर चर्चा झाली होती. कोरोना काळातील निर्बंधांमुळे गेल्या वर्षी संविधान दिवस साजरा झाला नाही. यावर्षी महामहिम राष्ट्रपतींनी संविधान प्रास्ताविका वाचन करून संविधान दिनाची सुरुवात करणे हे पहिल्यांदा घडत आहे.

केंद्र शासनाप्रमाणे संविधाना बद्दल जनजागृती तसेच संविधान दिन साजरा करण्यासाठी राज्य सरकारनेही आदेश पारित करून विशेष अधिवेशन बोलवावे, अशी विनंती सुनील माने यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading