कौटुंबिक पाककृतींची नोंद करीत, खाद्यसंस्कृती जतन करायला हवी – सुधा मेनन  

पुणे : अन्न हे आपल्या रोजच्या जीवनाबरोबरच आपली ओळख व संस्कृतीचा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र जेव्हा आपण कुटुंबातील पाककृतींचा मौल्यवान ठेवा नोंद करून ठेवत नाही तेव्हा आपण ती ओळख गमावत असतो. त्यामुळे खाद्यसंस्कृती जतन करायची असेल तर पाककृतींच्या नोंदी करायला हव्यात.असे मत सुप्रसिद्ध लेखिका सुधा मेनन यांनी व्यक्त केले.
सुधा मेनन लिखित ‘रेसिपीज फॉर लाईफ’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी घेतलेल्या मुलाखती दरम्यान मेनन बोलत होत्या. ‘रेसिपीज फॉर लाईफ’ या पुस्तकामध्ये भारतातील प्रसिद्ध व्यक्तींनी आपल्या आवडीच्या व घरात पिढ्यानपिढ्या बनत आलेल्या पदार्थांविषयीची माहिती देत त्याच्या पाककृतींविषयी संवाद साधला आहे.

पुस्तकाच्या संकल्पनेबद्दल बोलताना मेनन पुढे म्हणाल्या, “माझ्या सासूबाई या सीकेपी पद्धतीने स्वादिष्ट जेवण बनवायचे. त्या गेल्या नंतरच्या उन्हाळ्यामध्ये घरातील लोणच्याच्या बरण्या, मसाल्याची भांडी रिकाम्या असल्याची जाणीव मला झाली. त्या दरवर्षी हौसेने हे सर्व पदार्थ बनवायच्या आणि नातेवाईक व जवळच्या व्यक्तींना द्यायच्या. हे सर्व पदार्थ माझ्या सासूबाई त्यांची आई, सासू यांकडून शिकल्या होत्या. त्या गेल्यानंतर या पाककृती आमच्या कडे लिहिलेल्या नसल्याने त्या बनवायच्या कशा हा प्रश्न पडला. या नंतर अशा पाककृती नोंद करायचे आम्ही ठरविले. ही सर्व जमवाजमव करताना आईंच्या पाककृतींचा एक मोठा उत्सवच आम्ही अनुभविला. हाच धागा पकडत देशभरातील नावाजलेल्या ३०  व्यक्तींच्या घरात पिढ्यानपिढ्या बनणारे आणि त्यांना लहानपणापासून आवडणारे पदार्थ व त्यांच्या पाककृती या पुस्तकात मी नोंदविल्या आहेत.

या पुस्तकामध्ये मेरी कोम मणिपूर मधील आपल्या लहानशा मातीच्या घराच्या परसात उगविलेल्या भाज्या आणि औषधी वनस्पती यांची आठवण सांगत आईच्या साध्या शाकाहारी जेवणाची माहिती देते. अभिनेता आमीर खान आपली आई बनारसमध्ये मावशीकडे बिर्याणी, कबाब आणि मिठाई बनविणे कसे शिकली याच्या आठवणी सांगतो. ख-या अर्थाने या पुस्तकामध्ये लेखिका आपल्याला संपूर्ण भारताची खाद्य सहल घडवीते.

याशिवाय अभिनेत्री विद्या बालन, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज,कलाकार अतुल दोडिया, बँकर उदय कोटक, लेखक आमिष त्रिपाठी यांनी देखील आपल्या रोजच्या जेवणाच्या पाककृती या पुस्तकासाठी देऊ केल्या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: