क्षयरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाची खास मोहीम

पुणे:शहरातील क्षयरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाने खास मोहीम हाती घेतील आहे. दहा दिवसात ५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये हॉटेलमधील कामगार, झोपडपट्टीतील रहिवासी यासह इतर ठिकाणच्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून क्षयरोगाचे रुग्ण शोधले जाणार आहेत.  

पुणे शहरात २०१९ मध्ये ७ हजार ४५० रुग्ण होते, २०२१ मध्ये ५ हजार ६२५ रुग्ण आढळले होते. तर यंदा १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ६ हजार ७८ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. शहरात क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रोगाचा संसर्ग होण्याचा धोका आहे, त्यामुळे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

दाट लोकवस्तीमध्ये किंवा कमी जागेत राहणाऱ्या नागरिकांना क्षयरोगाची लागण होण्याची शक्यता असते. त्यासाठी २५ नोव्हेंबर पर्यंत प्रामुख्याने शहरातील ५७ झोपडपट्टीमधील ४ लाख ६५ हजार नागरिक, ८५० हॉटेल रेस्टॉरंट मधील ९२५० कामगार यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच १५ वृद्धाश्रम, ४८ बांधकाम स्थळे, ३ निर्वासितांची छावणी, ३ रात्र निवारा गृहे, यासह एड्सचे रुग्ण, बेघर नागरिक यांचाही समावेश आहे

सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, ‘‘शहरातील क्षयरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी १५ ते ५ नोव्हेंबर या १० दिवसात सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी २५० पथक निर्माण केले आहेत. पहिल्या दिवशी १५ रुग्ण आढळले असून, त्यांना त्वरित औषध सुरू केले आहेत. या रोगाची लागण झालेले रुग्ण शोधण्यासाठी पाच प्रश्‍न विचारले जात आहेत. याचा धोका टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा, खोकताना किंवा शिंकताना तोंड, नाक झाकावे, हात स्वच्छ धुवा व उघड्यावर थुंकू नये.

Leave a Reply

%d bloggers like this: