गलितगात्र भाजपचा केविलवाणा प्रयत्न; राष्ट्रवादीची टीका

पुणे : भाजपचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा हे २६ नोव्हेंबर रोजी पुण्यात येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते पुणे भाजपच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ आणि महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याचे समजते. खरे तर ही गलितगात्र झालेल्या भाजपची केविलवाणी धडपड आहे. कारण, महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या १०० नगरसेवकांनी सत्तेच्या काळात काय दिवे लावले आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे, कुणीही आले तरी काहीही फरक पडणार नाही. महानगरपालिका निवडणुकीत हरलेली भाजप आणि जिंकलेली राष्ट्रवादी हेच चित्र दिसून येईल, यात काही शंका नाही.

पुणेकरांनी मोठ्या अपेक्षेने २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता दिली. परंतु, सत्ताधारी भाजप आणि भाजपचे नगरसेवक यांच्याकडून नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेली पहिल्या क्रमांकाची महानगरपालिका असे चित्र निर्माण झाले आहे. सत्ताधारी भाजपने २०१७ पासून आतापर्यंत नेहमी आपले अपयश लपविण्याचाच प्रयत्न केला आहे. परंतु, आता हे अपयश उघडे पडले असून, गलितगात्र झालेल्या भाजपची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केविलवाणी धडपड सुरू आहे. त्यातच, केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा हे २६ नोव्हेंबर रोजी, संविधान दिनी पुण्यात येऊन महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे समजते. खरे तर ही गोष्ट आम्ही मजेने घेतो. कारण, कोल्हापूर सोडून पुण्यात तळ ठोकलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पुणेकर मते देणार नाहीत, नागपूरचे तथाकथित पोलादी पुरुष देवेंद्र फडणवीस यांच्या नावे मते मिळणार नाहीत, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावेही मते मिळणार नाहीत, याची पुरेपूर जाणीव भाजपला झाली आहे. त्यामुळे घाबरलेली भाजप अमित शहा यांना पुण्यात आणून त्यांच्या अमोघ वाणीने मते मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, मतदार पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी आले काय किंवा अमित शहा आले काय अजिबात भुलणार नाहीत. कारण, या नेत्यांकडूनही झालेला भ्रमनिरास मतदारांनी अनुभवलेला आहे. त्यामुळे, महानगरपालिका निवडणुकीत हरलेली भाजप आणि जिंकलेली राष्ट्रवादी हेच चित्र दिसेल, यात काही शंका नाही.

शिवाय, २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना प्रदान केली, तो हा दिवस. या दिवशी अमित शहा हे पुण्यात येऊन संविधान फलकापुढे नतमस्तक होत नाहीत, हे नियोजित कार्यक्रमात दिसून येत आहे. याकडेही पुणेकरांचे लक्ष असेल, हे नक्की.

Leave a Reply

%d bloggers like this: