fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

सिंहगड रोडवर दुमजली उड्डाणपुलाचा अट्टाहास नको

पुणे : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांची वाहतूककोंडीच्या दुष्टचक्रातून सुटका व्हावी, यासाठी सिंहगड रोडवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. मात्र, हा उड्डाणपूल दुमजली उभारल्यास अधिकचा २५ कोटींचा बोजा पडणार असल्याने तो दुमजली उभारण्यात येऊ नये, अशी सूचना महानगरपालिका प्रशासनाने केली असून, त्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे समर्थन करण्यात येत आहे. महानगरपालिकेतील सत्ताधारी या सूचनेकडे दुर्लक्ष करीत केवळ मनमानी कारभार करून काय साध्य करू पाहात आहेत, याचा विचार करण्याची गरज आहे.

सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना नेहमीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील नागरिकांना लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका निवडणुकीत केवळ आश्वासने देण्याचेच काम भाजपतर्फे करण्यात आले. सिंहगडकरांनीही एका पक्षाच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या पदरी भाजपकडून निराशाच पडली आहे. सिंहगडकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी सिंहगड रोडवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने अनुकूल भूमिका घेतली. नुकतेच केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे भूमिपूजनही झाले. या वेळी गडकरी यांनी या उड्डाणपुलाची उभारणी मलेशियन कंपनीच्या सूचनेनुसार आणि त्यांनी सुचविलेल्या आराखड्यानुसार व्हावी, अशी सूचना केली. महानगरपालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांनीही लगेचच आपल्या नेत्याच्या सूचना मान्य करण्यासाठी खटाटोप सुरू केली आहे. मात्र, सिंहगड रोडवरील उड्डाणपूल दुमजली झाल्यास अधिकचा २५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पुलाची रुंदी कमी होणार असल्याने वाहतूक कोंडी रोखण्याचा मूळ उद्देश साध्य होत नाही, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या पैशांची नासाडी होऊ नये, यासाठी प्रशासनाने घेतलेली ही भूमिका योग्य आहे. शिवाय, सिंहगड रोड परिसरातील नागरिकांसाठी मेट्रो सेवा उपलब्ध व्हायला हवी, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा वचननामा आहे. मेट्रो सेवा सुरू करायची झाल्यास त्यासाठीचा मार्गही हाच असणार आहे. कदाचित आता जो उड्डाणपूल उभारला जाईल, तो मेट्रोसाठी अडचणीचाही ठरू शकतो.

तरीही सद्यपरिस्थितीची गरज पाहता, या भागात उड्डाणपुलाची नितांत आवश्यकता आहे. मात्र, ते उभारताना उड्डाणपूल योग्य रुंदीचे असावे, वाहतूक कोंडी रोखली जावी, प्रदूषण टाळले जावे, या मूळ मुद्द्यांना बगल देण्यात येऊ नये, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading