Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

व्यापारीकरण बाजूला ठेऊन काम करणारे डॉक्टर हे समाजातील परमेश्वर – हेमंत रासने

पुणे : बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुण मुलांमध्ये देखील आजाराचे प्रमाण वाढत आहे. अनेक वैद्यकीय तज्ज्ञ यावर उपचार करीत आहेत. खरे तर डॉक्टर हा समाजाचा मुख्य घटक आहे. शारिरीक व्याधी किंवा आरोग्यविषयक संकट आले की आपल्याला प्रथम परमेश्वर आणि नंतर डॉक्टरांची आठवण होते. त्यामुळे व्यापारीकरण बाजूला ठेऊन समाजासाठी काम करणारे डॉक्टर्स हे समाजातील परमेश्वरच आहेत, असे मत पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी व्यक्त केले.

डायबेटिस केअर अ‍ँड रिसर्च फाऊंडेशन व अक्षय हॉस्पिटलतर्फे कर्वे रस्त्यावरील संस्थेच्या प्रांगणात जागतिक मधुमेह दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुष पुणे विभागाचे सहाय्यक संचालक व ससून हॉस्पिटलच्या आयुर्वेद विभागाचे प्रमुख डॉ. व्यंकट धर्माधिकारी, ह्रदयमित्र फाऊंडेशनचे श्रीकांत मुंदडा, अक्षय हॉस्पिटलचे डायबेटिस तज्ञ डॉ.सुहास एरंडे, राजाभाऊ घोडके आदी उपस्थित होते. ज्या लहान मुलांना व मधुमेह आहे, त्यांना मोफत इन्सुलिन यावेळी देण्यात आले. तसेच नागरिकांची विनामूल्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.

हेमंत रासने म्हणाले, मधुमेह दिन साजरा करावा लागू नये, असा दिवस येण्याकरीता प्रयत्न व्हायला हवेत. त्याकरीता प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यायला हवी. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद आणि निसर्गोपचार अशी उपचार पद्धती वेगवेगळी असली, तरी देखील प्रत्येकाचे आरोग्य चांगले रहावे, याकरीता ती पद्धती कार्य करत असते.

डॉ.सुहास एरंडे म्हणाले, मधुमेह तपासणीला शास्त्रीय नैमित्तीकपणा असणे गरजेचे आहे. ह्रदय, मुत्रपिंड आणि डोळे या अवयवांवर मधुमेहामुळे आघात होऊ शकतात. मधुमेहाचे प्रमाण वाढत असून मधुमेहाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे. त्याकरीता मधुमेहाचे आरोग्यदूत प्रत्येकाने व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. डॉ.व्यंकट धर्माधिकारी व श्रीकांत मुंदडा यांनी देखील मनोगत व्यक्त केले. राजाभाऊ घोडके यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading