बुधवार पेठेतील ‘त्या’ कोंडलेल्या श्वासांना भाऊबीजेतून नवसंजीवनी

पुणे : बुधवार पेठेतील देहविक्रीय करणा-या महिलांच्या वस्तीत कोंडलेल्या त्या श्वासांना माणुसकीसोबतच भाऊबीजेतून नवसंजीवनी मिळाली. पुरुषाचे एकच रुप पाहून मनामध्ये पुरुषांविषयीची वेगळी भावना निर्माण झालेल्या त्या महिला वडिल,  मित्र आणि भाऊ अशी पुरुषाची वेगवेगळी रुपे पाहून भारावून गेल्या. गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी आपुलकीने केलेली विचारपूस आणि साजरी केलेली भाऊबीज अनुभवताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

निमित्त होते, विधायक पुणे, वंचित विकास संस्था आणि पुण्यातील ११ गणेशोत्सव मंडळांतर्फे कार्यकर्त्यांच्या देवदासींसोबत भाऊबीज या कार्यक्रमाचे बुधवार पेठेत आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समिक्षक सुलभा तेरणीकर, वंचित विकासच्या मिनाक्षी नवले, आनंद सराफ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला ११ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. उपक्रमाचे यंदा १९ वे वर्ष होते.

सुलभा तेरणीकर म्हणाल्या, पुण्यनगरीचा इतिहास जसा संपन्न तशी उपेक्षित वस्तीची वेदना सुद्धा पुरातन आहे. अशा वस्तीतील वेदनांची, माणुसकीने दखल घेण्याचे कार्य महत्वाचे असते. गणेशोत्सव मंडळांचा भाऊबीजेचा उपक्रम, वेदनेवर फुंकर घालण्यासमान वाटतो. लालबत्ती विभागात माणुसकीची जपणूक यापुढे देखील वारंवार व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आनंद सराफ म्हणाले, सारेच दगड निष्प्राण नसतात, काही कोंडलेले श्वास असतात… घाव घालताना जपून घाला, काही शापित अहिल्या असतात… या उक्तींप्रमाणे जीवन जगणा-या या महिला आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम मंडळांतर्फे राबविले जातात. त्यातील हा उत्तम उपक्रम असून समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झालेल्या या महिलांना सण व उत्सव तितक्याच उत्साहाने साजरे करता यावे, यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. शिरीष मोहिते, सुनील पांडे, गिरीष पोटफोडे, सुरेश कालेकर, उमेश सपकाळ यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: