सनदी लेखापाल देशाच्या आर्थिक विकासाचा कणा – डॉ. भागवत कराड

पुणे : “देशाच्या आर्थिक विकासात सनदी लेखापालांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. विकसित देश म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेत होत असलेली प्रगती उल्लेखनीय आहे. अर्थव्यवस्थेला आकार देणारा स्तंभ, देशाच्या आर्थिक विकासाचा कणा म्हणून सनदी लेखापालांकडे पाहिले जाते. त्यांच्यामुळेच आर्थिक नियोजन चांगले होत आहे,” असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीने आयोजित संवाद भेट कार्यक्रमात डॉ. कराड बोलत होते. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ‘आयसीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए निहार जांबुसरिया, एशियन ओशिनियन स्टॅंडर्ड सेटर्स ग्रुपचे (एओएसएसजी) चेयर सीए डॉ. एस. बी. झावरे, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशीनाथ पठारे, समिती सदस्य सीए अभिषेक धामणे, सीए अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. भागवत कराड म्हणाले, “डॉक्टर लोकांचे शारीरिक आरोग्य, तर सनदी लेखापाल आर्थिक आरोग्य सदृढ ठेवण्याचे काम करतात. विकसित भारत घडवायचा, तर अर्थव्यवस्था सक्षम हवी. लोकांमध्ये अर्थसाक्षरता, डिजिटल व्यवहारांची जागरूकता आणि आर्थिक सर्वसमावेशकता व्हायला हवी. कोरोना काळात डिजिटल व्यवहारात वाढ झाली असून, बँकर्स, सीए, कर सल्लागार आणि संबंधीत लोकांनी चांगले काम केले आहे. जीएसटी संकलनात होत असलेली वाढ भारताची अर्थव्यवस्था योग्य दिशेने जात असल्याचे दिसते. २०१४ मध्ये देशाचे बजेट १७ लाख होते, ते आता दुपटीने वाढून ३५ लाख कोटीपर्यंत गेले आहे.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘फॉर द पीपल’ या तत्वावर हे सरकार काम करत असून, कोरोना काळात केलेल्या उत्तम नियोजनामुळे तिसऱ्या लाटेचा धोका संभवत नाही. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासह गरिबांना धान्य, औषधोपचार पुरविण्याचे काम झाले आहे. जनधन योजना, आरोग्य योजना, उज्ज्वला योजना लोकांपर्यंत पोहचायला हव्यात. देशातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते असायला हवे व ते चालू स्थितीत हवे, अशा पंतप्रधानांच्या सूचना आहेत. जन-धन योजनेत मोठ्या प्रमाणात यामध्ये यश मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. तरीसुद्धा आर्थिक साक्षरता विषयात मोठे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. याकरिता नाबार्डच्या सहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात एक वाहन देऊन आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी नमूद केले.

सीए निहार जांबुसरिया म्हणाले, “सीए इन्स्टिट्यूटने आर्थिक साक्षरता अभियान सुरु केले असून, १२ भाषेत व्हिडीओजच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हे अभियान पोहोचत आहे.” सीए डॉ. एस. बी. झावरे यांनी मार्गदर्शन केले. सीए समीर लड्डा यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रणव मंत्री, पूजा माहेश्वरी यांनी सूत्रसंचालन केले. सीए काशिनाथ पठारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: