एस.टी. विलीनीकरणाच्या लढ्याला ‘जनशक्ती’चा पाठिंबा

मुंबई: गेल्या अनेक दिवसापासून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या पाहता महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एस.टी.च्या विलीनीकरणाचा लढा महाराष्ट्रभर उभा केला आहे. या लढ्याला जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी पाठिंबा दर्शविला असून यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभा करून पडळकर यांना साथ देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिवाय आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील लालपरी अर्थात एस.टी. म्हणजे खेड्यापाड्यांचा जोडणारा दुवा आहे. शहर आणि खेड्यातील अंतर दूर करण्यासाठी या लालपरीने अखंड मेहनत घेतली आहे. असे असताना या लालपरी चा आत्मा असणारा कर्मचारी मात्र गेल्या अनेक वर्षापासून संकटांना तोंड देत आहे. तुटपुंज्या पगारावर तो राब राब राबत असल्याने त्याचा संसार घायकुतीला आलेला आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे संसार देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एस.टी.चे विलीनीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी विधानपरिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी एस.टी.च्या विलीनीकरणासाठी लढा उभारला आहे. आ. पडळकर यांच्या सारखा चळवळीतील युवक एस.टी. कर्मचाऱ्यांचे संसार वाचवण्यासाठी, महाराष्ट्रातील माय भगिनींचे कुंकू टिकविण्यासाठी धडपडत असून अशावेळी जनशक्ती संघटनेला शांत बसणे मान्य नाही.

त्यामुळे एसटीचे विलीनीकरण व्हावे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उभा केलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि लढ्यामध्ये प्रत्यक्षात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले असून जोपर्यंत आ.पडळकर आझाद मैदान वर आहेत किंबहुना या लढ्यासाठी ते जो निर्णय घेतील त्यांच्या सोबत आम्ही राहणार असल्याचे खूपसे पाटील यांनी सांगितले.

यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष नागेश चव्हाण, रऊफ पटेल, उमाकांत तिडके, राजू डफ, विनिता बर्फे, बाबासाहेब चव्हाण, बाबाराजे कोळेकर, शरद गायकवाड, रोहन नाईकनवरे, कल्याण गवळी, राणा महाराज, गणेश लंगोटे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: