काव्यांमधून उलगडली तरल भावनांची सुरेल मैफल

पुणे : खुले देवघर दरवळावे पहाटे निखारा धुमारे खडी धूप तू… कपाळी टिळा लावुनी चंदनाचा उभे विठ्ठलाचे दिसे रुप तू असे मातृत्वाचे आगळेवेगळे वर्णन करणारे काव्य… अरुणा ढेरे लिखीत रिमझीम पावसाचे स्वागत करणारे आला भरुन पाऊस तुला हवीशी ही हवा आणि नात्याचे बंध दृढ  करणारे दिल्या तुला तळव्याच्या रेषा तु शब्द मला दे साधा हे गीत…जोडप्यांमधील जुने प्रेम अंकुरीत करणारे पहावे नव्याने जरासे मला तू…अशा एकाहून एक सरस रचना सादर करीत मी गातो माझे गाणे ही शब्दांमधल्या तरल भावनांची सुरेल मैफल रंगली.

आरव पुणे निर्मित आणि विद्या हॉस्पिटॅलिटी आयोजीत युवा संगीतकार निखील महामुनी यांच्या मी गातो माझे गाणे या स्वरमैफलीचे आयोजन  करण्यात आले होते. नव्या कवितांच्या, नव्या गाण्यांच्या कार्यक्रमाच्या रुपाने आगळेवेगळे सादरीकरण अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली. नव्या-जुन्या कवी-कवयत्रींच्या दर्जेदार कवितांना निखील महामुनी यांनी आपल्या स्वरसाजाने सजविले त्यामुळे रसिकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे स्वरपर्वणी ठरली.

डॉ. सुनील काळे, स्वाती शुक्ल, डॉ.माधुरी चव्हाण-जोशी, संतोष वाटपाडे, डॉ.अरुणा ढेरे अशा नव्या-जुन्या कवी-कवयत्रींच्या दर्जेदार यावेळी सादर झाल्या. योगिता गोडबोले, अमिता घुगरी यांनी सहगायन केले. अभय गोखले यांनी निवेदन केले. चांगले काव्य, उत्तम विचार आणि नवनिर्मीतीचा आनंद देणारं संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली.

वातावरण प्रसन्न करणाऱ्या डॉ. सुनील काळे यांची रचना असलेल्या तु माझा देवा केवळू….तुझ्या कृपेवर जगलो आजवर तु बापा कनवाळू या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वाती शुक्ल यांची जोडप्यांतील हरवत चाललेल्या संवादाविषयी सांगणारे भेट नाही पावसाची होत हल्ली..ती म्हणे तू रोज भिजतोस हल्ली या गीताला प्रेक्षकांनी मिष्कील दाद दिली.

यानंतर ऋचा महामुनी हिने अतिशय प्रभावीपणे सादर केलेल्या खेळ का नको भातुकलीचा या प्रश्नाला मिळे ना उत्तर…काळीज का हो बनते पत्थर या स्त्री भ्रूण हत्येविषयी भाष्य करणाऱ्या गीताला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कोणालाही कमी लेखू नका, असे सांगणारी बाभळीची देहजाळी चंदनाला सांगते… ही रचना उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरली. स्वरमैफलीचा समारोप श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचा धागा उलगणारे कथा काव्य कृष्ण सुदामा या रचनेने झाला. गौरव भिडे यांनी सर्व रसिकांचे स्वागत केले. सायली जोशी यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

%d bloggers like this: