शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव’

पुणे : दिवाळी पाडव्याची मंगलमय संध्याकाळ… तुतारीची ललकारी… सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर आणि स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी केलेला श्री शिवछत्रपतींचा मर्दानी जयघोष… अशा शिवमय झालेल्या वातावरणात तिमिरातून तेजाकडे नेणा-या अष्टसहस्र पणत्यांच्या लखलखाटात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वातील पहिल्या भव्यदिव्य अश्वारूढ स्मारकापाशी दीपोत्सव साजरा झाला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव २०२१, पर्व १० चे. श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस संस्था प्रांगण येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई मंदिराचे विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांसह शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते झाले.
शिवजयंती १९ फेब्रुवारीला स्वराज्यघराण्यांची वज्रमुठ निर्माण करणा-या ऐतिहासिक सार्वजनिक शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सरनौबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दयार्सारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, भोई स्वराज्यबांधव, राजे लखोजीराव जाधवराव या स्वराज्यघराण्यांचा अखंड भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन विशेष गौरव करण्यात आला.
तसेच यंदा सहभागी झालेल्या स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे या स्वराज्यघराण्यांचा दीपोत्सवाचे सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ.रवींद्र शिसवे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या बरोबर लढणा-या वीर मावळ्यांचे, सरदारांचे वंशज यांचा गौरवशाली इतिहास याचे जतन, संवर्धन आणि सत्य स्वरुपात पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवून राष्ट्र समर्पित पिढ्या घडवणे आणि यासाठी अभिनव संकल्पनांना मूर्त स्वरुप देणे हे समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. भविष्यात समितीचे कार्य केवळ महाराष्ट्रालाच नव्हेतर देशाला दिशा देणारे ठरेल.
अमित गायकवाड म्हणाले, शिवरायांचे जगातील हे पहिले भव्य अश्वारुढ स्मारक तसेच एकसंघ ओतीव काम केलेले एकमेव स्मारक आहे. राजर्षि शाहुछत्रपती पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या स्मारकाचे अनावरण झाले होते. स्मारकाने यंदा ९३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्मारकाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पणत्यांची दिवाळी पाडव्याला शिवरायांना पारंपरिक मानवंदना देणारा हा एकमेव भव्यदिव्य दीपोत्सव आहे.
सोहळ्याचे नियोजन समितीचे रवींद्र कंक, सचिन पायगुडे, शंकर कडू, गोपी पवार, किरण देसाई, प्रवीण गायकवाड, युवराज शिंदे, किरण शितोळे, मोहन पासलकर, महेंद्र भोईटे, मयूर दळवी यांसह असंख्य स्वराज्य बांधवांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: