दिवाळी पाडव्याला श्री महालक्ष्मी देवीला ५६ प्रकारच्या पदार्थांचा भोग

पुणे : दिवाळी पाडव्याला सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीसमोर ५६ प्रकारच्या मिष्टांन्नाचा भोग लावण्यात आला. विविध प्रकारची मिठाई, फरसाण, चिवडा, फळे यांचे विविध प्रकार अन्नकोट म्हणून देवीसमोर मंदिर प्रशासनातर्फे मांडण्यात आले होते.

श्री महालक्ष्मी मंदिरात दिवाळीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने विशेष पूजा, श्री सुक्त अभिषेक, उत्सवमूर्ती विशेष कलशाभिषेक, ब्रह्म मुहूर्त दर्शन सोहळा असे विविध कार्यक्रम मंदिरात उत्साहात पार पडले.

ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल,  विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, नारायण काबरा आदींनी या कार्यक्रमांचे संयोजन केले आहे. दिवाळीच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक विद्युतरोषणाई व आरास करण्यात आली.

धनत्रयोदशीच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा श्री सुक्त अभिषेक देखील पार पडला. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने देवीला सोन्याची साडी देखील नेसवण्यात आली होती. दिवाळीच्या काळात होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता कोविडविषयी शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे. मंदिरामध्ये येताना भाविकांनी मास्कचा वापर करावा. तसेच भाविकांची तापमान तपासणी, सॅनिटायझेशन या सर्व सोयी मंदिरातर्फे करण्यात आल्या आहेत. तसेच महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट http://www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन दर्शनाची सोय देखील करण्यात आली आहे, असे अमिता अग्रवाल यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: