Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

पुष्पवृष्टी आणि भारतमातेच्या जयघोषात वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान

पुणे: देशासाठी लढण्याचे स्वप्न उराशी बाळगून देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणा-या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुणेकरांनी अनोखी मानवंदना दिली. कसबा गणपती मंदिराच्या आवारात रांगोळीच्या पायघडया, सनई-चौघडयांचे मंगलस्वर, सुवासिनींनी केलेले औक्षण आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने फुलांची उधळण करून केलेले स्वागत… अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात भारतीय सैन्यदलातील जवानांच्या वीरमाता व वीरपत्नींची भाऊबीज साजरी झाली.

विधायक पुणे आणि सहयोगी संस्थ्यांच्यावतीने कसबा गणपती मंदिरात वीरमाता व वीरपत्नींसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वीरमाता विद्या बारपट्टे, गीता गोडबोले, कुसूम ताथवडे, वीरपत्नी छाया पळसकर, वर्षा तांबे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. नंदू फडके, अभिनेते अजय पूरकर, हत्ती गणपती मंडळाचे शाम मानकर, आनंद सराफ आदी उपस्थित होते. गिरीश सरदेशपांडे, संगीता ठकार, कल्याणी सराफ, अनघा दिवाणजी, भोला वांजळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळे आणि संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

अ‍ॅड. नंदू फडके म्हणाले, सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी एक विशेष कार्ड तयार करण्याचा प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे ठेवू. ज्यामुळे ते कोठेही बाहेर गेल्यानंतर त्यांना प्रथम सुविधा मिळाली पाहिजेत. कारण त्यांच्या कुटुंबाला झालेले नुकसान आणि त्यांनी केलेल्या त्यागाची भरपाई आपण करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

अजय पूरकर म्हणाले, सैन्यदलात असणा-या जवानांच्या कुटुंबाचा त्याग किती मोठा आहे याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. त्यांनी केलेला त्याग आणि दाखविलेले धैर्य हे पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल.

वीरपत्नी वर्षा तांबे म्हणाल्या, माझे पती गेल्यानंतर मुलांचे शिक्षण आणि अनेक गोष्टी समोर होत्या. परंतु एकटीने हे सर्व कसे करायचे याची भीती वाटली नाही, कारण पुण्यातील गणेश मंडळे, संस्था व सैनिक मित्र परिवाराने दिलेले प्रेम आणि आधार मोठा होता. पुण्यातील लोकांचे भरभरून प्रेम आम्हाला मिळाले आणि पुढेही असेच मिळत राहो, अशी इच्छा ही त्यांनी व्यक्त केली. गिरीष पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले, पराग ठाकूर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading