गणेशोत्सव कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशनमध्ये अनोखी दिवाळी
पुणे : पोलीस बांधव संपूर्ण वर्षभर रात्रंदिवस आपल्या सर्वांच्या सुरक्षा व सेवेसाठी कर्तव्यदक्षपणे कार्यरत असतात अनेक वेळा त्यांना वर्षभरातील सण कुटुंबासमवेत साजरे करता येत नाहीत. त्यामुळे गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पोलीस स्टेशन मध्येच रोषणाई आणि दिव्यांची सजावट करून पोलिसांसमवेत दिवाळी साजरी केली.
अरण्येश्वर येथील एकता मित्र मंडळ ट्रस्ट, अखिल लक्ष्मी नगर रहिवासी संघ, गुरुवार पेठेतील वीर शिवराज मित्र मंडळ, सहकारनगर येथील पोलीस मित्र संघ यांनी पोलीस बांधवांसमवेत आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. यावेळी सुधीर ढमाले, किरण पोळ, किरण सोनीवाल व तिन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
.किरण सोनीवाल म्हणाले, दत्तवाडी पोलीस स्टेशन व दत्तवाडी पोलीस स्टेशन अंकित सारंग येथील लक्ष्मी नगर पोलिस चौकीमध्ये पोलिस बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. पोलीस बांधवांसाठी संपूर्ण चौकीची साफसफाई करून सर्वत्र रोषणाईच्या माळा लावून पोलीस चौकीचा संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्यात आला.
