Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

लक्ष्मीपूजनाला सुवर्णवस्त्रांनी सजले श्री महालक्ष्मी देवीचे रुप

पुणे :  शुद्ध सोन्यात बनविलेली सुमारे १६ किलो वजनाची साडी सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाकडून नेसविण्यात आली. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता गुरुवारी देवीभक्तांनी मोठी गर्दी केली.

दिवाळीनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने विशेष पूजा, श्री सुक्त अभिषेक, उत्सवमूर्ती विशेष कलशाभिषेक, ब्रह्म मुहूर्त दर्शन सोहळा असे विविध कार्यक्रम मंदिरात सुरु आहेत.

ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल,  विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, नारायण काबरा आदींनी या कार्यक्रमांचे संयोजन केले आहे. लक्ष्मीपूजनाला देवीला नेसविण्यात आलेली ही सोन्याची साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी १० वर्षांपूर्वी ही साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे.
दिवाळीच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक विद्युतरोषणाई व आरास करण्यात आली आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा श्री सुक्त अभिषेक देखील पार पडला. दिवाळीच्या काळात होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता कोविडविषयी शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे. मंदिरामध्ये येताना भाविकांनी मास्कचा वापर करावा. तसेच भाविकांची तापमान तपासणी, सॅनिटायझेशन या सर्व सोयी मंदिरातर्फे करण्यात आल्या आहेत. तसेच महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन दर्शनाची सोय देखील करण्यात आली आहे, असे अमिता अग्रवाल यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading