राष्ट्र प्रथम ही भावना प्रत्येकामध्ये रुजायला हवी- वीरमाता सुमेधा चिथडे यांचे मत

पुणे : देहाकडे देवाकडे जाताना देश लागतो, हे आपण विसरता कामा नये. राष्ट्र सुरक्षित असेल, तर आपल्या आजच्या आणि पुढच्या पिढया सुरक्षित राहतील. केवळ स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला देश व सैनिकांना आठविणे, हे चुकीचे आहे. त्यांची आठवण आपण कायम ठेवायला हवी. त्याकरीता राष्ट्र प्रथम ही भावना प्रत्येकामध्ये रुजायला हवी, असे मत सियाचीन येथे भारतीय सैनिकांसाठी आॅक्सिजन प्रकल्प उभारण्याकरीता पुढाकार घेणा-या वीरमाता सुमेधा चिथडे यांनी व्यक्त केले.

सैनिक मित्र परिवार व २१ सहयोगी संस्था-गणेशोत्सव मंडळांतर्फे वीरमातांना राष्ट्रसेवा कार्यासाठी निधी समर्पण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ गणेश मंदिरासमोर करण्यात आले होते. यावेळी वीरमाता ॠता देसाई, वीरपिता भरत देसाई लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे समन्वयक भालचंद्र कुंटे, शिरीष मोहिते, आनंद सराफ यांसह २१ गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक संस्था व गणेश मंडळांतर्फे वीरमातांना ४१ हजार रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला.

सुमेधा चिथडे म्हणाल्या, टोकाच्या प्रतिकूलतेमध्ये भारतीय सैनिक सिमेवर काम करीत असतात. त्यामुळे अशा सैनिकांप्रती कर्तव्य म्हणून आपण बांधिल रहायला हवे. सैनिक सुरक्षित रहावा, याकरीता प्रत्येकाने प्रार्थना व प्रयत्न करायला हवे. देशासाठी वाईट व घातक कृत्य होणार असेल, तर त्याविरोधात चांगल्या विचारांच्या नागरिकांनी एकत्रितपणे उभे रहायला हवे. एकत्रित राहू, राष्ट्र सुरक्षित ठेवू, असेही त्या म्हणाल्या.

आनंद सराफ म्हणाले, सन १९९६ पासून सैनिकांसाठी कृतीशील काम करण्याचा प्रयत्न सैनिक मित्र परिवाराच्या माध्यमातून केला जात आहे. गणेशोत्सव मंडळांची ताकद फार मोठी आहे. त्यामुळे भाऊबीज सणाच्या माध्यमातून या वीरमातांना भाऊबीज देऊन देशकार्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. सैनिकांच्या कुटुंबांप्रमाणेच प्रत्यक्ष सैनिकांची सेवा करण्याची छोटीशी संधी यामाध्यमातून कार्यकर्त्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गिरीश पोटफोडे, विष्णू ठाकूर, कुमार रेणूसे, अनिल पानसे, पीयुष शाह आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: