आपुलकीच्या दिवाळीत चिमुकल्यांची दिन दिन दिवाळी…!

पुणे : दिन दिन दिवाळी… शंकरा रे शंकरा रे…देवा श्री गणेशा… अशा विविध गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करीत श्रीवत्समधील चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली. आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी भुकेलेल्या असणा-या या चिमुकल्यांना आपुलकीच्या भावनेने सामान्यांनी देखील जवळ घ्यावे आणि त्यांच्या डोक्यावरुन मायेचा हात फिरवावा, यासाठी आयोजित कार्यक्रमात पुण्यातील २० सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.

निमित्त होते, शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सहयोगी संस्थांतर्फे दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, याकरीता श्रीवत्स संस्थेत आयोजित आपुलकीची दिवाळी या कार्यक्रमाचे. यावेळी भिक्षेक-यांचे डॉक्टर म्हणून ओळख असलेले डॉ. अभिजीत सोनावणे, डॉ.मनिषा सोनावणे, सोफोशच्या चेअरपर्सन अमला फाटक, शर्मिला सय्यद, मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, अनंता कावणकर, ह.भ.प.चारुदत्त आफळे, आनंद सराफ, पराग ठाकूर, शिरीष मोहिते, कुमार रेणुसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यंदा २३ वे वर्ष आहे. श्रीवत्स संस्था आणि डॉ.अभिजीत सोनावणे यांच्या सोहम ट्रस्ट या संस्थांना यांना आवश्यक असणारी आर्थिक व वस्तुरुपी अशी ५ लाख रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली.

डॉ.अभिजीत सोनावणे म्हणाले, डॉक्टरांकडे पदव्या असतात, ते मोठया कष्टाने या पदव्या मिळवितात. पण आम्हाला भिक्षेक-यांचे डॉक्टर म्हणून पदवी समाजाने दिल्याचा आनंद आहे. समाजातील सर्व घटकांनी केलेल्या सहकार्याने आम्ही हे कार्य करु शकतो. डॉक्टरांना कोणताही वेद समजला नाही तरी चालेल, पण डॉक्टरांना रुग्णाच्या मनातील वेदना समजायला हव्यात. तरच त्यांच्या दु:खात आपण त्यांना दिलासा देऊ शकतो.

पराग ठाकूर म्हणाले, तब्बल २२ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा उपक्रम ५०० रुपये मदतीपासून सुरु झाला होता. आजमितीस या उपक्रमाला समाजातील विविध गणेशोत्सव मंडळे आणि दानशूरांकडून मोठया प्रमाणात सहाय्य मिळत आहे. समाजातील वंचित घटकांना गरजेच्या वस्तू देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: