fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

साखरेचे इथेनॉलमध्ये रुपांतर करणे काळाची गरज – नितीन गडकरी

पुणे  : आज आपण १२ लाख कोटी रुपये पेट्रोलियम प्रोडक्टसच्या आयातीवर खर्च करीत आहोत. यापैकी तब्बल ८ लाख कोटी रुपये हे पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांवरच खर्च होतात. देश ७५ – ८० % पेट्रोलियम उत्पादन आयात करीत असताना पुढील पाच वर्षांत आयातीवरील हाच खर्च २५ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल. या परिस्थितीत पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी करण्याबरोबरच प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायोसीएनजी, ग्रीन हायड्रोजन या देशी इंधनांच्या विकसनावर काम सुरू आहे. याबरोबरच अतिरिक्त साखरेच्या उत्पादनाचे इथेनॉलमध्ये रुपांतर करणे ही आज काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्टस् असोसिएशन (डीएसटीए) चे ६६ वे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले, त्यावेळी ऑनलाईन माध्यमाद्वारी गडकरी सहभागी झाले होते.

कर्नाटकचे मंत्री मुरुगेश निरानी, डीएसटीएचे अध्यक्ष शहाजी भड, कार्यकारी सचिव आरती देशपांडे, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, डीएसटीएच्या ६६ व्या वार्षिक संमेलनाच्या आयोजन समितीचे प्रमुख सोहन शिरगावकर, राष्ट्रीय साखर संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन अग्रवाल आणि राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी या वेळी उपस्थित होते.

यावेळी साखर उत्पादन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करण्याऱ्या डॉ. प्रमोद चौधरी, नरेंद्र मोहन अग्रवाल, कांतिभाई पटेल, बाळकृष्ण जमदग्नी आणि बी. डी. पवार या असोसिएशनच्या सभासदांना जीवन गौरव पुरस्कार तर साखर उद्योगात कार्यरत असणाऱ्या मुरुगेश निरानी, राजाभाऊ शिरगावकर, विद्याधर अनास्कर, रोहित पवार, समरजितसिंह घाडगे आणि हसमुख भाई भक्ता यांना साखर उद्योग गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

साखर उत्पादन व त्याचाशी संबंधित असलेल्या संस्थांकडून उत्पादन, शेती, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन आदी विषयांवर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यातील संस्थेच्या सभासदांकडून मागविण्यात आलेल्या सर्वोत्तम ४२ शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वोत्कृष्ट शोध निबंधासाठी दिले जाणारे मंगल सिंह सुवर्ण पदक यंदा मुंबई साखर संघाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम. एस. मराठे यांना प्रदान करण्यात आले.

नितीन गडकरी म्हणाले, “आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. देशाची साखरेची गरज ही २४० लाख टन असताना मागील वर्षी ३१० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. या वर्षीचे उत्पादन देखील याच्याच जवळपास असणार आहे, त्यामुळे नजीकच्या भविष्यात वाढते साखर उत्पादन हे संकट ठरण्याची शक्यता आहे. म्हणूनच जादा साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये करून उत्पादनावर नियंत्रण ठेवणे आणि सोबतच इथेनॉलचा वापर वाढवून प्रदूषण रोखणे यावर काम व्हायला हवे.”

आज पेट्रोलमध्ये केवळ २० टक्के इथेनॉल टाकून आपण शांत बसू शकत नाही. येत्या सहा महिन्यात देशात फ्लेक्स इंजिनचा वापर अनिवार्य करण्याचा आमचा विचार आहे. टोयोटा कंपनीने देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी व युरो ६ चे इमिशन नॉर्म्स असलेली गाडी तयार केली असून, यामध्ये १०० टक्के पेट्रोल व १०० इथेनॉल असा पर्याय असल्याने इथेनॉल वापरात वाढ करता येणे शक्य आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत इथेनॉलचे प्रदूषण कमी असून त्याचा दुहेरी फायदा आपल्याला मिळेल. इथेनॉलवर चालणारी तीन चाकी व दुचाके वाहने तयार करावीत यासंदर्भात माझी बजाज कंपनी व इतरांशी चर्चा झाली असून ते ही याविषयी सकारात्मक आहेत. हे सत्यात उतरल्यास पुण्यासारख्या शहरात लवकरच सर्व रिक्षा या इथेनॉलवर चालू शकणार आहेत.

देशात सध्या ८० हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात केले जाते. सूर्यफूल, सोयाबीन, पामोलीन तेल हे बाहेरून मागवावे लागते. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी देशातील पिकांचा पटर्न बदलावा. यासाठी ऊसाच्या मधल्या भागात तेलबिया लावा असा सल्लाही गडकरी यांनी दिला. विमान उड्डाणासाठी लागणा-या इंधनात ५० टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्यात आपण यशस्वी झाल्यास नव्या क्षेत्राची बाजारपेठ खुली होईल. या संदर्भात संबंधितांसोबत दिवाळीनंतर बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.

पुढील दोन वर्षांचा काळ हा देशातील साखर उत्पादकांसाठी सुवर्णकाळ असल्याचे सांगत इथेनॉल निर्मितीमुळे साखरेच्या अधिक उत्पादनामुळे उभ्या राहणा-या समस्या सुटतील, असे शहाजी भड यांनी सांगितले. मोना देठे यांनी सूत्रसंचालन केले तर आरती देशपांडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading