पुण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) चा प्रकल्प अंतिम टप्यात
वाहतूक नियम तोडणाऱ्या मंडळींना येणार स्वयंचलित पद्धतीने चलन
पोलीस उपमहानिरीक्षक व पुणे शहराच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती
पुणे : शहराची वाहतूक व्यवस्था उत्तम करण्यासाठी पोलिसांकडून हाती घेण्यात आलेला इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अर्थात आयटीएमएसचा प्रकल्प अंतिम टप्यात आला असून या माध्यमातून वाहतूक नियम तोडणाऱ्या मंडळींना थेट स्वयंचलित पद्धतीने नियमभंगाचे चलन येणार असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक आणि पुण्याच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे (सीप) तर्फे हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉग या कार्यक्रमादरम्यान पाटील बोलत होते. कार्यक्रमाला ग्लोबल सस्टेनिबिलिटी इम्पॅक्ट कोच आणि सेवा ब्रिज फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण डी. एम, पिनॅकल इंडस्ट्रीजचे आणि ईकेए मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष असलेले डॉ. सुधीर मेहता, क्लायमट ट्रूपर्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नटराजन, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या मेडिकल आणि हेल्थ सायन्सेस विभागाचे कुलसचिव प्रो. राजीव येरवडेकर, सीपचे अध्यक्ष शिवराज साबळे, उपाध्यक्ष शिवेश विश्वनाथ, माजी अध्यक्षा विनिता गेरा, व्यवस्थापकीय समिती सदस्य बालचंद्र नामजोशी, ईएसजी विभागाच्या अवंती कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कॉर्पोरेट संस्थांना सीएसआर निधीचा प्रभावीपणे वापर करता यावा आणि तो निधी योग्य संस्थांपर्यंत वितरीत व्हावा, अधिकाधिक चांगले व समाजपयोगी कामे व्हावीत या उद्देशाने सीपच्या वतीने एन्व्हायर्नमेंटल सोशल गव्हर्नन्स म्हणजेच ईएसजी फोरमची निर्मिती वर्षभरापूर्वी करण्यात आली या फोरमचा एक भाग म्हणून दुसऱ्या पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वदेश फाउंडेशन, १४ ट्री फाउंडेशन, हर्षदीप फाउंडेशन, ताराचंद हॉस्पिटल, इको सरक्युलर, ऍनिमल एंजल, इको एक्झिट, लाईफ लॅब, स्वरूपवर्धिनी या स्वयंसेवी संस्थांनी देखील यामध्ये सहभाग घेतला.
पुण्याची वाहतूक समस्या हा सध्या गंभीर विषय आहे. १९९५ मध्ये पुणे हे ८६ स्केअर किलोमीटर इतके होते. २०२५ मध्ये ते ३७३ स्केअर किलोमीटरपर्यंत जाऊन पोहचले आहे. त्यामध्ये ३३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाहनांच्या वेगाच्या मर्यादेमध्ये जागतिक पातळीवर पुण्याचा क्रमांक हा पाचवा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांचे प्रमाण पुण्यात ११ टक्यापर्यंत आहे. २०१२ मध्ये सार्वजनिक बससेवेचा म्हणजे पीएमपीएमएलचा वापर करणारे १२ लाख लोक होते, आजही हा आकडा बदलेला नाही. मेट्रोचा वापर करणारे लोक तीन लाखापर्यंत आहेत. पुण्यामध्ये खासगी वाहनांची संख्या ७८ लाखापर्यंत पोहचली असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली.
पुण्याची वाहतूक व्यवस्था उत्तम करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना सुरु आहेत. त्यामध्ये ट्रॅफिक आणि ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंगची टीम तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) आणि एआयचा वापर करून वाहतुकीला शिस्त लावण्यात येणार आहे. आयटीएमएसची अंमलबजावणी झाल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना स्वयंचलितपणे चलन येणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे काम कमी होणार आहे. शहरातील ३२ महत्वाच्या रस्ते निश्चित करून त्यावर काम सुरु करण्यात आले आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले.
पाटील पुढे म्हणाले की, “वाहतुकीचे नियम तोडल्यामुळेच शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मॅपमाय इंडिया, गुगल, टॉमटॉम यांची मदत आम्ही घेत आहोत. शहरांमध्ये नव्याने विकसित होत असणारे रस्ते, उड्डाणपूल यांची उभारणी करण्याआधी योग्य ती माहिती घेऊन काम करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम करण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. पुढल्या पाच वर्षांत पुण्यामध्ये १२० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे तयार होईल. नागरिकांनी देखील सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची गरज आहे.”
शहरांमध्ये परिवर्तन घडत चालले आहे, त्यामुळे येथे कोणते स्थानिक प्रश्न आहेत हे समजून घेऊन त्यावर काम करण्याची आवश्यकता असल्याचे किरण डी एम यावेळी म्हणाले.
शहरांमध्ये असणारे प्रश्न सोडविण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. पर्यावरणात होणारे बदल, प्रदूषण, वाहतूक समस्या असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. आपले पुणे लाडके पुणे असल्याने त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रो. राजीव येरवडेकर यावेळी म्हणाले.
अलीकडच्या काळात सोशल मीडियाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपल्याला समाजाच्या भल्यासाठी चार चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर त्यामध्ये वेळ खर्च करण्यापेक्षा तो त्या कामामध्ये लावावा, त्याचा देश घडवण्यासाठी निश्चितपणे फायदा होईल, असे डॉ. सुधीर मेहता म्हणाले.
विद्याधर पुरंदरे यांनी ईएसजी फोरम विषयी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे माहिती दिली. ते म्हणाले, “गेली अनेक वर्ष पुणे शहरातील सॉफ्टवेअर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासोबतच संघटीत ठेवण्यासाठी सीप कार्यरत आहे. नेतृत्त्व, तंत्रज्ञान, गो टू मार्केट आणि ऑपरेशनल एक्सलन्स या चार महत्त्वाच्या विभागात सीप प्रामुख्याने काम करते. मात्र कंपन्यांना त्यांच्या सीएसआर उपक्रमासाठी एक शाश्वत व्यासपीठ उभारण्याच्या दृष्टीने संस्थेच्या वतीने मागील वर्षी ईएसजी अर्थात एन्व्हायर्नमेंटल सोशल गव्हर्नन्स या विषयावरील काम हाती घेण्यात आले. या अंतर्गत सीप हे कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांमधील महत्त्वाचा दुवा बनले आणि नागरिकांसाठी एक शाश्वत व्यासपीठ निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. याचाच एक भाग म्हणून मागील वर्षीपासून आम्ही पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉगचे आयोजन करीत आहोत. पुण्यात शाश्वत बदलासाठी एक जिवंत परिसंस्था निर्माण करणे, हाच यामागील प्रमुख उद्देश आहे.” या व्यासपिठाअंतर्गत शहरातील पर्यावरणीय प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्था, झोपडपट्ट्यांशी संबंधित प्रश्न, अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रश्न, आर्थिक दुर्बल घटकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे अशा अनेक विषयांवर काम करण्याचे सीपने ठरविले आहे.
पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉगचे सूत्रसंचालन पूजा कुलकर्णी यांनी केले तर शिवेश विश्वनाथ यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.
