शेतकऱ्याच्या दारात किमान १-२ देशी गायी असणे गरजेचे – पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे मत

पुणे : गाय, शेण, गोमुत्र आणि त्याच्याशी निगडीत उत्पादनांचा वापर ही आपली पारंपरिक संस्कृती आहे. सध्या ही संस्कृती हरवत चालली आहे. प्रत्यक्षात शेणात लक्ष्मी, गोमुत्रात सरस्वती आणि गंगेचा वास व गुणधर्म असतात. घरात येणा-या सर्व छोटया-मोठया आजारांवर हा सर्व गोष्टी गुणकारी आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतक-याच्या दारात किमान १ ते २ देशी गायी असणे गरजेचे आहे, असे मत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह संचलित गोसंवर्धन महासंघाच्या माध्यमातून पुण्यातील घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृह येथे राष्ट्रीय गोसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी राहीबाई पोपेरे बोलत होत्या. कार्यक्रमाला कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, धारिवाल फाऊंडेशनच्या शोभा धारिवाल, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक, उद्योजक प्रदीप चोरडिया, शेखर मुंदडा, महेंद्र देवी, येमुल गुरुजी, अतुल सराफ, राजेंद्र लुंकड, संजय मुरदाळे, भाऊराव कुदळे, अशोक टांकसाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

गो आधारित उत्पादन  प्रदर्शनाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले आहे. यामध्ये गुजरातसह महाराष्ट्रातील परभणी, नांदेड, नगरसारख्या विविध भागांतून आलेल्या शेतक-यांनी व गो उत्पादकांनी आपली उत्पादने मांडली आहेत. याशिवाय मोफत नाडी परीक्षण, पंचगव्य चिकित्सा देखील आहे. सोमवार, दिनांक १ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे.

राहीबाई पोपेरे म्हणाल्या, गोमातेचा आशिर्वाद हा परमेश्वराच्या पलिकडचा आशिर्वाद आहे. देशी गाईचे दूध हे केवळ दूध नसून अमृत आहे. शेतक-यांनी शेतात देशी शेणखत वापरल्याने पिक चांगले येते. तसेच ते अन्न खाल्याने आजार होत नाहीत. आपल्या शेतामध्ये देशी बी हवे, तरच पुढच्या पिढया आरोग्यसंपन्न जगतील. काळी माती ही आपली आई आहे, ती चांगली राहिली तरच आपण चांगले राहू. यासाठी प्रत्येक गावात देशी बी बँक असायला हवी. काळ्या मातीचे आरोग्य आपण सांभाळायला हवे.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, शेण व गोमुत्रापासून अनेक चांगली उत्पादने तयार होतात. त्यामुळे गाईपासून मिळणा-या सर्वच गोष्टींचे गुणधर्म उत्तम आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा देशी व चांगल्या वस्तूंचा प्रचार प्रसार व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

शोभा धारिवाल म्हणाल्या, पंचगव्य उपचारांचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे देशी गायीशी संबंधित उपचारांचा वापर करण्याची प्रवृत्ती वाढविण्यास प्रयत्न करणे गरजेचे अहे. देशातील या संपत्तीचा प्रचार जगभर व्हायला हवा, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात रमेश अग्रवाल म्हणाले, प्रकृती केंद्रित समाज विकासासाठी राष्ट्रीय गोसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समुहाच्या माध्यमातून राज्यातील १०० पेक्षा अधिक गोपालक  संस्थांचा समूह गोसंवर्धन महासंघ म्हणून राज्यात कार्य करत आहे. गो संवर्धन आधारित रोजगार निर्मिती, गो संवर्धन आधारित  कृषी व्यवस्था, चिकित्सा व्यवस्था विषयी प्रचार व्हावा तसेच गो विज्ञान विषयी सर्वांना मार्गदर्शन उपलब्ध व्हावे यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: