आजच्या वैचारिक लढाईत सरदार पटेल यांचे चरित्र अभ्यासनीय : डॉ. कुमार सप्तर्षी

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ.कुमार सप्तर्षी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

‘ सरदार पटेल यांचे राष्ट्र बांधणीतील योगदान ‘ हा या व्याख्यानाचा विषय होता. गांधी भवन, कोथरूड येथे हे व्याख्यान झाले.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘ सरदार पटेल हे भारतातील शेतकऱ्यांचे पहिले नेते होते.

गांधीजींच्या सांगण्यावरून चंपारण मधील निळीच्या लढयात शेतकऱ्यांचे नेतृत्व पटेलांनी केले. त्यांचे नेतृत्व घडवले. नवं अहमदाबाद ही पटेल यांची महापौरपदाच्या काळातील निर्मिती आहे. त्यांच्यात प्रशासकीय क्षमता, निर्णयक्षमता मोठी होती. नेहरू आणि पटेल यांच्यातील मतभेद तात्विक होते. पण, अंतर नव्हते.नेहरू पंतप्रधान व्हावेत, हीच सरदार पटेल यांची भूमिका होती. सरदारांना डावललं , हा आरोप खरा नाही. उलट संघाबद्दलचे त्यांचे अनुमान परखड होते, ते आजही सिद्ध होते.

संस्थानांचे विलीनीकरण सरदार पटेलांशिवाय शक्य नव्हते.हे विलीनीकरण झाले नसते भारतात पाचशे तरी स्वातंत्र्यदिन साजरे झाले असते. आजच्या परिस्थितीत वैचारिक लढाई लढायची तर आजच्या तरुणांनी ही चरित्रे अभ्यासली पाहिजेत.

स्वातंत्र्यलढयाची बांधणी, राष्ट्र बांधणी, पक्ष बांधणी आणि एकमेकांतील वैयक्तिक संबंध या मुद्दयांवर कार्यकर्त्यानी सरदार पटेलांचा अभ्यास केला पाहिजे, असे डॉ. सप्तर्षी म्हणाले.

संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी डॉ. प्रवीण सप्तर्षी, जांबुवंत मनोहर , सचिन पांडुळे,कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: