Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

किंग्ज रॉयल रायडर्स तर्फे डोंगराळ भागातील कातकरी समाजाला जीवनावश्यक वस्तूंची मदत

पिंपरी : लोणावळातील तुंग डोंगराच्या पायथ्याशी एक कठीण आणि अत्यंत अवघड डोंगराळ भागात आदिवासी समुदायाची एक छोटी वस्ती वसलेली आहे. ही वस्ती मुख्य गावापासून तुटलेली आहे आणि त्यामुळे त्यांना दैनंदिन आणि मूलभूत गरजांसाठी कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. स्वच्छ पाणी, वीज आणि पक्के घर या सारख्या मूलभूत गरजांसाठी देखील येथील रहिवासी दररोज संघर्ष करतात. किंग्ज रॉयल रायडर्स मोटरसायकल क्लब जो किंग्ज आर्मी म्हणूनही प्रसिद्ध आहे, त्यांनी या वस्तीच्या मूलभूत गरजांची दखल घेतली आणि काही महत्त्वाचे साहित्य पुरवण्याचे काम हाती घेतले.

गौतम कौल यांच्या नियोजनाखाली, तसेच अनुप राजन यांच्या नेतृत्वासह किंग्स आर्मी क्लबचे सदस्य, त्यांचे कुटुंबिय आणि मित्रांकडून देणग्या गोळा करून पिण्याचे पाणी, आवश्यक किराणा, सौर दिवे, ब्लँकेट, कपडे, रेन कव्हर्स, जलशुद्धीकरण फिल्टर, लहान मुलांसाठी मैदानी खेळणी आणि चित्रकलेचे साहित्य पुरविण्यात आले. या सोबत सर्व रायडर्सनी तिथल्या मुलांबरोबर काही खेळ आणि शर्यतीचे आयोजन केले होते. तसेच मुले आणि महिलांना स्वच्छ्ता आणि आरोग्यासाठी चांगल्या सवयींबद्दल माहिती दिली. मिठाई, दिवे वाटप करून त्यांची दिवाळीची सुरुवात करून दिली. त्यांच्यासोबत जेवणाचे आयोजन केले. यावेळी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद क्लबसाठी खूप समाधानकारक ठरला.

मोटारसायकलिंग क्लब म्हणून विरंगुळ्यासाठी देशभर फिरण्याला प्राधान्य असले, तरी समाजातील वंचित घटकासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे. या उद्देशाने क्लबच्या सदस्यांनी ऐच्छिक योगदानाद्वारे जमा केलेला निधी समाजातील वंचित घटकांसाठी वापरण्यात येत आहे. क्लबचे सदस्य नेहमीच विविध संस्थांतर्फे आयोजित सामाजिक बांधिलकी असलेल्या कार्यक्रमात भाग घेतात. महिला सक्षमीकरण, कर्करोग जनजागृती, रस्ता सुरक्षा, रक्तदान शिबिरे, स्मारके स्वच्छ करणे आणि त्यांची देखभाल करणे, किल्ले जीर्णोद्धार यासारखे विविध विषय क्लबने हाती घेतले आहेत.
समाज दररोज नवीन आव्हानांना सामोरे जात असताना, किंग्ज रॉयल रायडर्स मोटरसायकल क्लब या आव्हानांकडे गरजू लोकांच्या दैनंदिन जीवनात बदल घडवून आणण्याची संधी म्हणून पाहत आहे. तुंग गावाजवळील वस्तीवर चालवल्या गेलेल्या उपक्रमांसारखे उपक्रम ही क्लबच्या पोर्टफोलिओमधील एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. येत्या काळात त्यांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी आम्ही या वस्ती सोबत काम करत राहू, असे आश्वासन प्रयास टीमचे गौतम कौल, राहुल दीक्षित, रोहित गिरी, स्नेहल गिरी, अमित देशपांडे, रवी डोगरा आणि अभिषेक पुरोहित यांनी दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading