Thursday, September 24, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल कडून पुणे स्टेशन ते न्हावरे नवीन बस मार्ग सुरू

पुणे : पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक १६४ – पुणे स्टेशन ते न्हावरे गाव हा नवीन बस मार्ग दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात आला. न्हावरे येथे शिरूर-हवेली मतदार संघाचे आमदार मा. श्री. अशोकबापू पवार यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. न्हावरे गावचे भूषण असलेले सेवानिवृत्त आय.ए.एस. अधिकारी  किशोरराजे निंबाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अतिशय उत्साही वातावरणात व जल्लोषात बससेवेचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे-पाटील, शिरूर तालुका मार्केट कमिटीचे चेअरमन वसंतराव कोरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष  रविबापू काळे, शिरूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  सागरराजे निंबाळकर, न्हावरे गावच्या सरपंच अलका शेंडगे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक  दत्तात्रय झेंडे, पास विभाग प्रमुख  विक्रम शितोळे, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर  संजय कुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्ग क्र.१६४ – पुणे स्टेशन ते न्हावरे या बससेवेचा मार्ग पुणे स्टेशन, येरवडा, रामवाडी, चंदननगर, सणसवाडी, शिक्रापूर फाटा, तळेगांव ढमढेरे, निमगाव म्हाळुंगे फाटा, होमाचीवाडी, घोलपवाडी, दहिवडी, पारवडी फाटा, उरळगाव फाटा, कोळपेवस्ती, गणेश नर्सरी, कुटे वस्ती चौक, मल्लिकार्जुन कॉलेज, न्हावरे गाव असा आहे.
याप्रसंगी बोलताना आमदार  अशोक पवार म्हणाले,”येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा व इथेनॉल वर चालणाऱ्या वाहनांचा आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात ई-बसेस असून लवकरच वाघोली येथे ई-बस डेपो होणार आहे.  किशोरराजे निंबाळकर यांनी या बससेवेसाठी चांगला पाठपुरावा केला. डॉ. राजेंद्र जगताप यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली. विद्यमान अध्यक्ष    लक्ष्मीनारायण मिश्रा हे देखील चांगले काम करत आहेत. न्हावरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ही बससेवा अखंडपणे सुरू राहण्यासाठी बससेवेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.”

दत्तात्रय झेंडे म्हणाले,”पुणे जिल्ह्याच्या ९ तालुक्यांमध्ये पीएमपीएमएल ची बससेवा सुरू होती. नुकतीच आंबेगाव व बारामती तालुक्यात बससेवा सुरू झाली आहे. पीएमपीएमएलच्या दैनिक ७० रुपये व मासिक १४०० रुपये तर ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनिक ४० रुपये व मासिक ५०० रुपयांचा पास सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी मासिक ७५० रुपयांचा पास असल्याने पुणे शहरात शिक्षणासाठी ये-जा करणे विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. सध्या या मार्गावर ३ बसेस सुरू करीत आहोत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून आणखी बसेस वाढविल्या जातील.”

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading