महापालिकेच्या मुख्यसभेत नवले पूल येथील भीषणअपघाताचे पडसाद
पुणे : नवले पूल येथे घडलेल्या भीषण अपघाताचे पडसाद आज महापालिकेच्या मुख्यसभेत उमटले. नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिकार्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) , पोलिस यांच्या कारभारावर टीका करत कात्रज देहू महामार्गाची रखडलेली काम पूर्ण करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर महापालिकेत एनएचएआय, पोलिस विभागांची दोन दिवसात बैठक बोलवा, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला दिले.
महापालिकेेची मुख्यसभा सुरू झाल्यानंतर नगरसेवक अजित दरेकर यांनी नवले पूल येथे झालेल्या अपघाताचा विषय उपस्थित केला. या महामार्गावर आत्तापर्यंत ६८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी अपघात झाल्यानंतर एनएचएआय महापालिकेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. पण सुधारणा होत नसल्याने लोकांचे घर उद्धस्त होत आहेत, अशी टीका केली.
सचिन दोडके म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने सर्व्हिस रोड वारजे वगळता इतर ठिकाणी झालेले नाहीत. यंत्रणांमध्ये समन्वय नाही. सल्लागार काय करतात”दिलीप बराटे म्हणाले, नवले पूल येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे यावर तोडगा निघाला पाहिजे. चांदणी चौका प्रमाणे येथेही उपाययोजना झाली पाहिजे. यासाठी महापौरांनी लक्ष घालून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करावी.
गणेश बिडकर म्हणाले, जेथे चुका आहेत त्या सुधारल्या पाहिजेत. विद्यापीठ चौकातील पूल चुकीचा होता म्हणून पाडला. एवढी चर्चा झाली त्यावर एक उपाय निघावा. बाॅटलनेक वर डीपीआर तयार करून तो सभागृहात मांडवा. त्यास मंजूर करून काम करावे, असे बीडकर यांनी सांगितले.
हरिदास चरवड, दिलीप वेडे पाटील, वसंत मोरे, अविनाश बागवे, गणेश ढोरे वर्षा तापकीर, सुभाष जगताप, वृषाली चौधरी, अश्विनी कदम आदी नगरसेविकांनी या मुद्द्यावर भूमिका मांडली. यावर प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी केली. परंतु महापौरांनी त्यास नकार दिला.
महापौर म्हणाले, नवले पूलासह इतर विषय मांडले आहेत. त्याचा एकत्रित विचार करण्यासाठी दोन दिवसात एनएचएआय, पोलिस अधिकारी यांची बैठक महापालिकेत द्यावी. येथे झालेल्या चर्चेचा अहवाल गडकरी यांना पाठवू.
