बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक हवा – चंद्रकांत पाटील
पुणे : पुण्यातील बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखायच्या असतील, तर कायद्याचा धाक निर्माण होण्याची गरज असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. रविवारी रात्री त्यांनी मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, भाजपा आपदा कोषच्या माध्यमातून दोन लाखाची आर्थिक मदत देऊन सर्वतोपरी कायदेशीर मदत उपलब्ध करुन देण्याचे कुटुंबियांना आश्वस्त केले.
यावेळी पुणे शहर संघटन राजेश पांडे, आमदार सुनिल कांबळे, शहर उपाध्यक्ष दिनेश धाडवे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष भीमराव साठे, नगरसेविका वर्षा साठे, नगरसेविका रुपाली धाडवे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
या भेटीवेळी मुलीच्या दिव्यांग भावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना जशी शिक्षा होत होती, तशी शिक्षा हत्याकांडातील आरोपीला व्हावी, अशी मागणी केली. यानंतर पाटील यांनी कुटुंबियांना धीर देत गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, मृत मुलगीच कुटुंबाचा आर्थिक आधार असल्याने, तिच्या हत्येने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत देऊ केली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात गुन्ह्यांचा दोषसिद्धी दर फक्त ९ टक्के होता. ही सर्वांसाठी चिंतेची बाब होती. पण देवेंद्रजींच्या काळात राज्यात कायद्याचा धाक होता. त्यामुळे दोषसिद्धीदर (कनव्हिक्शन रेट) ५३ टक्के इतका होता. पाच वर्षात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक होता. तेव्हा अशा घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक निर्माण होण्याची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की, पीडित कुटुंबियांच्या पाठिशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून एक वकील देखील देऊ,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
