समाज टिकण्याकरीता कुटुंब टिकणे गरजेचे – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. क्रांतिगीता महाबळ
पुणे : मुले मोठी झाली की आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात, हा अधर्म आहे. समाज टिकायचा असेल, तर कुटुंबपद्धती टिकायला हवी. स्त्रियांच्या सबलीकरणाचा विषय अनेकदा येतो. परंतु दुसरे कोणी आपल्याला मदत करेपर्यंत स्त्रियांनी न थांबता दुबळेपणा सोडून सक्षम व्हायला हवे. तरच कुटुंब व पर्यायाने समाज टिकून राहिल, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. क्रांतिगीता महाबळ यांनी व्यक्त केले.
प्रभात जन प्रतिष्ठान व प्रभात मित्र मंडळातर्फे महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात ‘आपुलकीची भाऊबीज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहराच्या पूर्व भागातील १५० गरजू भगिनींना दिवाळीपूर्वीच दिवाळीचे साहित्य व धान्य देण्यात आले. कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, उद्योजक राहुल येमुल, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शोभा सुपेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उदय वाडेकर, अविनाश निरगुडे, ओंकार नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. किटमध्ये २५ प्रकारच्या वस्तू व धान्य देण्यात आले आहे. कार्यकर्त्यांना महिलांनी औक्षण देखील केले.
पांडुरंग राऊत म्हणाले, सामाजिक समरसता हा महत्वाचा भाग आहे. जात-पंथ-धर्म विसरुन आपण प्रत्येकाने एकत्र येऊन काम करायला हवे. मंडळ व प्रतिष्ठानच्या माध्यमातून संकटकाळात तरुणाई समाजाच्या मदतीला उभी रहात असल्याचे चित्र कौतुकास्पद आहे. समाजाच्या तळागाळात काम करताना कार्यकर्ता तावून-सुलाखून निघतो व चांगल्या प्रकारे घडतो.
किशोर चव्हाण म्हणाले, दिवाळीचा दिवा प्रत्येक घरात प्रकाशित झाला पाहिजे, या उद्देशाने शहराच्या पूर्व भागातील गरजू महिलांसाठी आगळा-वेगळी भाऊबीज आम्ही साजरी करतो. कुटुंबातील ४ ते ५ व्यक्तिंसाठी महिनाभर पुरतील इतके साहित्य या किटमध्ये दिले आहे. सण-उत्सवाच्या माध्यमातून समाजाच्या गरजू घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मंडळ, प्रतिष्ठान व युवा कार्यकर्ते सतत करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. विवेक फुले, कुणाल जगताप, मंगेश शिंदे, मनोज शेलार, कृष्णा परदेशी, शिवराज मलगुडे, तुषार ओझा आदींनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला. निलेश कांबळे, रवींद्र भन्साळी यांनी सूत्रसंचालन केले.
