दगडूशेठ गणपती मंदिरात आता ‘हार्ट स्टार्ट’ मशिनची सुविधा
पुणे : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि हजारोंच्या संख्येने ज्या मंदिरात व आजूबाजूच्या परिसरात भाविकांची गर्दी असते अशा दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हार्ट स्टार्ट मशिनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लायन्स क्लब आॅफ पुणे आणि एन.एम.वाडिया इन्स्टिटयूट आॅफ कार्डिओलोजीच्या पुढाकाराने फिलिप्स हार्ट स्टार्ट एक्सएल डिफॅबिलेटर मशिन म्हणजेच कोणालाही ह्रदयविकाराचा झटका आल्यास त्वरीत उपचार देणारे हार्ट स्टार्ट मशिन नुकतेच ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडे एन.एम.वाडिया इन्स्टिटयूट आॅफ कार्डिओलोजीचे ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन पत्की, डॉ. प्रमोद नारखेडे, डॉ.रवी उग्रण, डॉ.सुमित जुमराणी, नितीन दळवी, लायन्स क्लबच्या हेल्दी हार्ट प्रकल्पाचे चेअरमन राजकुमार राऊत, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल हेमंत नाईक, अॅड. शोभा कदम, सतिश राजहंस, शाम खंडेलवाल, पुणे मेट्रोपोलीस क्लबचे अध्यक्ष ॠषिकेश देवरे यांनी हे हार्ट स्टार्ट मशिन सुपूर्द केले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी उपस्थित होते.
डॉ.नितीन पत्की म्हणाले, एखाद्याची ह्रदयक्रिया बंद पडली असता, हे मशिन ह्रदयाचा रिदम ओळखून ह्रदयाला धक्का किंवा शॉक देऊन ह्रदय पुन्हा पूर्ववत सुरु करु शकते. परदेशात गर्दीच्या अनेक ठिकाणी हे मशिन उपलब्ध आहे. दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे याठिकाणी या मशिनची जास्त आवश्यकता आहे. या मशिनद्वारे आपण अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.
ॠषिकेश देवरे म्हणाले, ह्रदयरोग होऊ नये म्हणून किंवा ह्रदयविकाराने हानी होऊ नये म्हणून जी काही पावले उचलावी लागतील, त्यादृष्टीने दगडूशेठ गणपती मंदिरात हे मशिन आम्ही दिले आहे. सर्व कर्मचारी वर्गाला हे मशिन वापरण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. एखाद्या भक्ताला ह्रदयविकाराचा झटका आला, तरी मंदिरात त्वरीत उपचार मिळणे शक्य होणार आहे. सीपीआर दिला तर ६० टक्के रुग्ण वाचतात. त्यामुळे प्रशिक्षणात या सर्व गोष्टी शिकविण्यात येणार आहेत. ह्रदय जनजागृती उपक्रमांतर्गत हा उपक्रम लायन्स क्लबतर्फे होत आहे. पुण्यातील गर्दीच्या ठिकाणी ही मशिन देण्याचा प्रयत्न आहे.
