Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

आप पालक युनियन व सावित्री सन्मान फौंडेशन च्या पुढाकाराने पालक जनसुनवाई सभा


पुणे: राष्ट्र सेवा दल येथे आप पालक युनियन च्या पुढाकाराने पालक जन सुनवाई घेण्यात आली.  त्यात खाजगी शाळांच्या पालकांनी अनेक खासगी शाळांच्या लुटीच्या कथा आणि  आणि पालकांच्या व्यथा सांगितल्या. दीड वर्षानंतरही पालकांचे प्रश्न सुटलेले नाहीत हेच यातून पुढे आले. आणि लढणाऱ्या पालकांना सर्वप्रथम शिक्षण विभागाने सन्मानाने वागवले पाहिजे असेही सभेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी शिक्षण अधिकार्यांना सुनावले.
 
आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी ‘कोरोना काळात लॉकडाऊन असताना फी मध्ये सूट असावी यासाठी पालक लढत होते. असा निर्णय सुप्रीम कोर्टानेही दिला, परंतु राज्य सरकारने पालकांची फसवणूक करीत ढिसाळ आदेश काढला. यातून अनेक शाळांनी पालकांना त्रास दिला. त्यामुळे त्यांच्या व्यथांना लोकशाही मार्गाने तक्रार निवारणासाठी लोकअदालत स्वरुपात एक मंच उपलब्ध करून देणे या या जन सुनावणीचा उद्देश असल्याचे सांगितले. दिल्ली , राजस्थान , मध्य प्रदेश पश्चिम बंगाल येथील पालकांना न्याय मिळाला परंतु फक्त महाराष्ट्रामध्ये राजकीय अधिकारी – प्रशासन आणि शाळा संचालक यांच्या युतीमुळे पालकांना फी मध्ये सवलत नाकारली गेली आहे असे सांगितले.   
 
आज पालकांनी अनेक समस्यांना वाचा फोडली. पुण्यातील तसेच पिंपरी आणि चाकण येथूनही पालक या सभेला आले होते. प्रत्येक शाळेने पालकांना एकत्र पणे उत्तरे न देता एकेकाला वयक्तिक पातळीवर संपर्क करून फी वसुली करण्याचा प्रयत्न केला हेही यातून समोर आले.
ऑनलाईन शिक्षण बंद करणे ,शाळा दाखला परस्पर घरी पाठवून देणे , ट्रान्स्फर दाखला नाकारणे , फी कमी न करणे , पालक शिक्षक कार्यकारी समितीच्या बैठका न घेणे , पुस्तके , वाहतूक या साठी अवाच्या सवा पैसे आकारणे , परीक्षेला बसू न देणे , मुलांना सर्व मित्रांसमोर अपमानास्पद वागणूक देणे आदी समस्या पालकांनी मांडल्या. युरो,वॉलनट, न्यू पुणे पब्लिक,पायस चाकण,ज्ञान गंगा, मिलेनियम, क्रिमसन आलिशा, वात्सल्य, प्रेसटीज,एमआयटी सह अनेक शाळांचे पालक उपस्थित होते.

आयोजनात सामील सावित्री सन्मान फौंडेशन च्या सोनल कोद्रे यांनी पालक लढाई मध्ये एकजूट महत्वाची असते असे सांगत शाळा बहुतेक वेळा शिक्षण अधिकाऱ्यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवतात असे सांगितले .  
 
या जनसुनवाई साठी उपशिक्षण संचालक उकिरडे यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी अनिल गुंजाळ व विस्तार अधिकारी शब्बीर शेख उपस्थित होते. त्यांनी पालकांच्या समस्यांच्या नोंदी घेतल्या असून येत्या २-३ दिवसात त्याबाबत पुढील कार्यवाही करू असे आश्वासन त्यांनी दिले.
 
सभेचे अध्यक्ष सुभाष वारे यांनी पालकांच्या समस्यांचा लेखाजोखा घेत मंत्रालयातील अधिकारी झारीतील शुक्राचार्य असतात असा विद्यार्थी चळवळीपासूनचा अनुभव असल्याचे सांगत सरकारी शाळा सुधारणे आणि त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी दबाव निर्माण करणे हाच यावर दीर्घकालीन उपाय असल्याचे सांगितले . शेकडो पालकामधून न्यायासाठी पुढे येणाऱ्या पालकाला प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यायला हवी असे शिक्षण अधिकार्यांना सुनावले.       

आप पालक युनियनचे तुषार कासार यांनी सूत्र संचालन केले . 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading