टीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, आता 21 नोव्हेंबरला होणार परीक्षा
मुंबई : राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी टीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 30 ऑक्टोबर रोजी होणारी टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रक आपल्या संकेतस्थळावर जारी करीत हे स्पष्ट केले आहे.
यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी (TET) 30 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यादिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. दरम्यान, सतत परीक्षेची तारीख बदलत असल्याने परिक्षार्थी नाराज आहेत.
टीईटी (TET) परीक्षांच्या तारखांमध्ये तिसऱ्यांदा बदल
– 10 ऑक्टोबरची नियोजीत टीईटी परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आल्याने 31 ऑक्टोबराला घेण्याचे ठरले
– 31 ऑक्टोबरची नियोजीत टीईटी परीक्षा आरोग्य विभागाची परीक्षा आल्याने 30 ऑक्टोबरला घेण्याचे ठरले
– 30 ऑक्टोबरची नियोजीत टीईटी परीक्षा आता देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीमुळे 21 नोव्हेंबरला घेण्याचे ठरले आहे.
