पीएमपीएमएल कडून पुणे स्टेशन ते वाळकी नवीन बस मार्ग सुरू
पुणे : पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक १३५ – पुणे स्टेशन ते वाळकी हा नवीन बस मार्ग आज दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात आला. वाळकी येथे पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके, माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेशआप्पा थोरात यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात वाळकी येथे बसची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, पास विभाग प्रमुख विक्रम शितोळे, दिलीपराव हाके, संजय थोरात, नानासाहेब चोरमले, मोहन चोरमले यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्ग क्र.१३५ – पुणे स्टेशन ते वाळकी या बससेवेचा मार्ग पुणे स्टेशन, येरवडा, रामवाडी, चंदननगर, वाघोली, केसनंद, वाडेबोल्हाई, आष्टापुर फाटा, न्हावी फाटा, दहिटणे फाटा, पाटेठाण फाटा, ढुबेवाडी, राहु, भांडवाडी, टिळेवाडी फाटा, कोरेगाव फाटा, वाळकी गाव असा आहे.
यावेळी बोलताना रमेश थोरात म्हणाले,”पीएमपीएमएल ची सेवा ही सर्वसामान्यांना परवडणारी अतिशय चांगली बससेवा आहे. पीएमपीएमएलने सुरू केलेल्या यवत, वरवंड, चौफुला या बसेसना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसाच प्रतिसाद या बससेवेला देखील मिळेल.”
पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके म्हणाले,” पीएमपीएमएल ची बस सेवा सुरू झाल्याने वाळकी हे गाव खऱ्या अर्थाने पुणे शहराला जोडले जाणार आहे. दैनिक ७० रुपये व मासिक १४०० रुपये तर ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनिक ४० रुपये व मासिक ५०० रुपयांच्या पासामुळे ग्रामीण भागाला स्वस्तात मिळणारी बससेवा आहे. विशेषत: शेतकरी व विद्यार्थ्यांना या बससेवेचा चांगला फायदा होणार आहे. ज्या पद्धतीने बसचे स्वागत झाले त्यावरून बस सेवा सुरू झाल्याचा लोकांना किती आनंद झाला आहे हे आज वाळकी गावात पाहिले.”
काकासाहेब तापकीर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बाळासाहेब थोरात यांनी आभार मानले.
