पीएमपीएमएल कडून पुणे स्टेशन ते पारगाव नवीन बस मार्ग सुरू
पुणे : पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक १३७ – पुणे स्टेशन ते पारगाव (सालू मालू) हा नवीन बस मार्ग आज दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात आला. पारगाव येथे पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके, माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेशआप्पा थोरात यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात व जल्लोषात पारगाव (सालू मालू) येथे बसची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके, दौंड तालुका पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके, माऊली शिंदे, पोपटभाई ताकवणे, शांताराम बांदल, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, पास विभाग प्रमुख विक्रम शितोळे, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्ग क्र.१३७ – पुणे स्टेशन ते वाळकी या बससेवेचा मार्ग पुणे स्टेशन, येरवडा, रामवाडी, चंदननगर, वाघोली, केसनंद, वाडेबोल्हाई, आष्टापुर फाटा, न्हावी फाटा, दहिटणे फाटा, पाटेठाण फाटा, ढुबेवाडी, राहु, शिरकोली, देलवडी, वाळकी संगम, गलांडवाडी, पारगाव असा आहे.
रमेश थोरात म्हणाले,” पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने पीएमपीएमएल च्या बसने प्रवास करा हे सांगण्याची आता गरज नाही. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व सर्व सामान्य नागरिकांना अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध असणाऱ्या दैनिक व मासिक पास द्वारे पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्रात कितीही फिरता येते. आमदार निलेश लंके हे खऱ्या अर्थाने आरोग्यदूत आहेत. त्यांनी ११०० बेडचे कोविड सेंटर उभारून कोरोना रुग्णांची रात्रंदिवस प्रामाणिक सेवा केली.”
आमदार निलेश लंके म्हणाले,”पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन ते पारगाव या बस सेवेचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले, हे मी माझे भाग्य समजतो. बस सेवा सुरू झाल्याचा आनंद इतका असतो हे इथे आल्यानंतर पाहायला मिळाले. मी अनेक उद्घाटनाचे कार्यक्रम केले परंतु हा कार्यक्रम माझ्या सदैव स्मरणात राहील. आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने कोविड सेंटर उभारून लोकांच्या मनातील कोरोना बद्दलची भीती काढण्याचे काम केले. ८० टक्के लोकांचा मृत्यू कोरोनाच्या भीतीमुळे झाला. योगा, योग्य व पौष्टिक आहार, करमणुकीचे कार्यक्रमांचे आयोजन करून कोविड सेंटरमधील रुग्णांच्या डोक्यातून कोरोना काढला. माणसात परमेश्वर पाहिला आणि रुग्णांची सेवा केली.”
