जुन्या पिढीच्या चांगल्या गोष्टी घेऊन नव्या पिढीचे देखील स्वागत करा – प्रतिभा शाहू-मोडक
पुणे : वृद्धावस्था वाईट नाही. जुनी पिढी चांगली, नवी पिढी वाईट असे काही नसते. चांगला किंवा वाईट माणसाचा स्वभाव असतो. जुन्या पिढीच्या चांगल्या गोष्टी घेऊन नवीन पिढीचे देखील स्वागत करायला पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शाहू मोडक यांनी व्यक्त केले.
श्री भवानी प्रतिष्ठान व परिवर्तन ट्रस्ट यांच्या वतीने स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. शैलेश गुजर, हेमंत जाधव, अखिल झांजले, संतोष फुटक उपस्थित होते. यावर्षीचा स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मुरलीधर मोहोळ, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांच्या पत्नी वंदना सुर्यकांत पाठक, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांच्या पत्नी मीना अविनाश भोंडवे, पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या पत्नी डॉ. शिल्पा रविंद्र शिसवे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या पत्नी ज्योती महेश सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला.
प्रतिभाताई शाहू मोडक म्हणाल्या, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला आपण शिकले पाहिजे. आनंद हा आनंद असतो, तो छोटा किंवा मोठा नसतो. त्यामुळे जीवन मनसोक्त जगायला हवे. निस्वार्थीपणा असेल तर तुमचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
हेमंत जाधव म्हणाले, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या जीवनात त्यांच्या पत्नीचा महत्वाचा सहभाग असतो. पण अशा यशस्वी पुरुषाची पत्नी कधीही समाजासमोर येत नाही. ती करत असलेल्या त्यागाची कल्पनाही आपल्याला नसते. अशा यशस्वी पुरुषाच्या पत्नीचा स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार देउन आम्ही गौरव करीत आहोत.
