श्रीमंत नानासाहेब पेशवे जन्मस्थानी नामफलकाचे उद्घाटन
पुणे : श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या जन्माला यंदा 300 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे स्मारक समिती आणि साते ग्रामस्थांच्या वतीने मावळ तालुक्यातील साते गाव येथे पुणे-मुंबई महामार्गावर नामफलकाचे अनावरण करण्यात आले. श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचा जन्म ६ डिसेंबर १७२१ रोजी मावळ तालुक्यातील साते गाव येथे झाला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे स्मारक समितीचे अध्यक्ष मोहन शेटे, १७५८ साली अटकेवर भगवा झेंडा फडकवणारे सरदार मानाजी पायगुडे यांचे वारसदार राजकुमार पायगुडे, सागर पायगुडे, अमोल पायगुडे आणि गणेश पायगुडे, साते गावचे सरपंच संतोष शिंदे, माजी उपसरपंच एकनाथराव येवले, पंचायत सदस्य ऋषीनाथ आगळमे तसेच जिजाऊ प्रतिष्ठानच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.
राजकुमार पायगुडे म्हणाले, श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या काळात मराठ्यांनी अफगाणीस्तान सीमेवरील पेशावरपर्यंत जाऊन विशाल हिंदवी साम्राज्याची निर्मिती केली. मानाजी पायगुडे यांनी अटकेवर भगवा झेंडा फडकवून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण केले. मराठ्यांच्या इतिहासाचा हा तेजस्वी वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. सागर पायगुडे म्हणाले, पूर्वजांच्या इतिहासापासून प्रेरणा घेऊन आपणही विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविले पाहिजे.
मोहन शेटे म्हणाले यावर्षी श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांची त्रिशताब्दी जयंती आहे. यानिमित्त सातेगावच्या प्रवेशद्वाराशी भव्य कमान उभारणे, नानासाहेब पेशवे गौरव ग्रंथाचे प्रकाशन असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. तसेच ६ डिसेंबरला त्यांच्या 300 व्या जन्मदिनी भव्य समारंभ आयोजित केला जाणार आहे. सर्व इतिहासप्रेमींनी यामध्ये सहभागी व्हावे, असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
